ग्राहकोपयोगी उत्पादनातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडच्या (जीएसकेसीएच) विलीनीकरणाची गुरुवारी घोषणा केली. अलीकडच्या काळातील ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या क्षेत्रातील हा ३१,७०० कोटी रुपयांच्या घरात जाणारा सर्वात मोठा व्यवहार असून उभय कंपन्यांच्या भागधारकांसाठी लक्षणीय मूल्यनिर्मितीला यातून चालना मिळेल. ३ डिसेंबर २०१८ रोजी या विलीनीकरण योजनेची घोषणा करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचयूएलच्या संचालक मंडळाने गुरुवारी जीएसकेकडून त्यांच्या हॉर्लिक्स या नाममुद्रेचे ३७५.६ दशलक्ष युरो (३०४५ कोटी रुपये) मोबदल्यात अधिग्रहण करण्यास मंजुरी दिली. युनिलिव्हर आणि जीएसके यांच्यात झालेल्या मूळ करारातील तरतुदीनुसार या पर्यायाचा अवलंब करण्यात आला. याखेरीज, या विलीनीकरणामुळे बूस्ट, माल्टोव्हा आणि विवा या जीएसकेच्या मालकीच्या अन्य उत्पादन नाममुद्राही एचयूएलच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.

वर्ष १९३०च्या सुमारास भारतात सुरुवात झालेल्या हॉर्लिक्सचा आरोग्यवर्धक उत्पादन बाजारपेठेतील हिस्सा जवळपास ५० टक्के असून पिढय़ान्पिढय़ा घराघरांतील पोषणआहारात त्याचा समावेश आहे. या विलीनीकरणामुळे भारतात फायदेशीर आणि शाश्वत असा पोषणआहार व्यवसाय उभारण्याच्या एचयूएलच्या योजनेला बळ मिळेल. जीएसकेचे जागतिक दर्जाचे अन्य ब्रँड्स (इनो, क्रोसिन, सेन्सोडाइन इ.) आणि एचयूएलची वितरण क्षमता यांच्यातील या भागीदारीमुळे उभयतांसाठी मूल्यनिर्मिती होण्याबरोबरच हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बाजारपेठीय क्षमतेचाही अधिक विस्तार होणार आहे, असे मत हिंदुस्तान युनिलिव्हरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी व्यक्त केले.

भागधारकांना काय?

विलीनीकरण योजनेनुसार ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील एका समभागासाठी एचयूएलचे ४.३९ समभाग दिले जाणार आहेत. हे नवे समभाग जारी केल्यानंतर एचयूएलमधील पालक कंपनी युनिलिव्हरचा हिस्सा सध्याच्या ६७.२ टक्क्य़ांवरून ६१.९ टक्के होणार आहे. सध्या करोना छायेमुळे भांडवली बाजारात भयंकर पडझड सुरू असताना, विलिनीकरण होत असलेल्या उभय कंपन्यांचे समभाग मात्र नवनवीन उच्चांक गाठत होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gsk merger with hindustan unilever abn
First published on: 03-04-2020 at 00:30 IST