पीटीआय, नवी दिल्ली : देशातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाने जून महिन्यात १.४५ लाख कोटींचा टप्पा गाठल्याचे अर्थमंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. मार्च महिन्यापासून सलगपणे करसंकलनाने १.४० लाख कोटींपुढील मजल कायम राखली आहे. अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि ग्राहकांकडून मागणीत वाढ झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षांतील जून महिन्याच्या तुलनेत कर संकलन यंदा ५६ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ९२,८०० कोटींचे संकलन नोंदवले गेले होते.

सरलेल्या जून २०२२ मधील एकत्रित जीएसटी महसूल १,४४,६१६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी महसुलाची रक्कम २५,३०६ कोटी, राज्य जीएसटीची रक्कम ३२,४०६ कोटी आणि एकात्मिक जीएसटीची रक्कम७५,८८७ कोटी रुपये (आयात वस्तूंवर मिळालेल्या ४०,१०२ कोटी रुपयांसह), उपकर संकलनाची रक्कम ११,०१८ कोटी (आयातीवर मिळालेल्या १,१९७ कोटी रुपयांसह) इतकी होती, असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे कायम असून त्यात निरंतर वाढ होत आहे. जीएसटी संकलनासाठी १.४० लाख कोटी हा आता तळ निश्चित झाला असून यापुढे ते कायमच वाढते राहणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या जीएसटीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला होता. त्यानंतर जून २०२२ मधील संकलन हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन आहे.