रुग्णालयात दाखल झाल्यानंतर येणाऱ्या खर्चाकरिता कर्ज सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य फायनान्सने येत्या तीन वर्षांत ७५० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य राखले आहे. यासाठी असलेल्या १८ लाख कार्डाचे वितरणही या कालावधीत केले जाणार आहे.
अल्प व मध्यम उत्पन्न गटातील रुग्णांना रुग्णालयात होणाऱ्या खर्चाकरिता रामतीर्थ लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्सने कर्ज सुविधा असलेले ‘आरोग्य फायनान्स’ हे कार्ड तीन महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिले. यामार्फत (२०० कार्ड) आतापर्यंत ८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोस पीटर यांनी सांगितले.
रुग्णालयातील उपचार, दाखल शुल्क तसेच औषधोपचार आदींसाठीच्या खर्चाकरिता कर्ज ‘आरोग्य फायनान्स’च्या कार्डाद्वारे उपलब्ध आहे. ही सुविधा महाराष्ट्रातील निवडक ५७ ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये असून ती विस्तारण्याचा मनोदयही पीटर यांनी व्यक्त केला. वर्षभरातील कार्डाची संख्या एक लाखांचा टप्पा पार करेल, असेही ते म्हणाले.
रुग्णालय आदी खर्चाकरिता रक्कम उभी न करण्यामुळे देशात वर्षांला ४ कोटी लोक गरिबीच्या छायेत येतात असे नमूद करत पीटर यांनी एकूण रुग्णालय तसेच औषध आदी खर्चापैकी केवळ २५ टक्के रक्कमच वैयक्तिकरीत्या उभारली जाण्याचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आणले. या प्रकारासाठी कर्ज घेण्याची संकल्पना भारतात नवी असून वाढत्या गरजेपोटी त्यातही वाढ दिसून येईल, असेही ते म्हणाले.
‘आरोग्य फायनान्स’मार्फत मासिक ७,५०० रुपयांवर उत्पन्न असलेल्या ५० हजार ते २ लाख रुपयेपर्यंत कर्ज जूनपासून उपलब्ध करून देण्यात आले. सहा महिने ते तीन वर्षे कालावधीसाठीच्या या कर्जाकरिता वार्षिक १२ टक्के दर लागू होतो.