रोजगारातील सुरक्षितता आणि वाढणारे उत्पन्न याविषयीचे वातावरण येत्या काही महिन्यांमध्ये ग्राहकांची क्रयशक्ती वाढविण्यास पूरक ठरेल, असे निरीक्षण समोर आले आहे.
‘झायफिन रिसर्च’ या वित्तीय संशोधन आणि विश्लेषण कंपनीने जानेवारीचा ग्राहक आढावा निर्देशांक गुरुवारी जारी केला. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत यंदाचा निर्देशांक हा १० टक्क्य़ांनी उंचावला आहे.
गेल्या वर्षांतील शेवटच्या काही महिन्यांपासून ग्राहकांचा एकूणच व्यवस्थेविषयीचा आशावाद उंचावला असून, त्यामुळे पुढील कालावधीत खर्च करण्याची त्यांची तयारीही असल्याचे या आढाव्यातून स्पष्ट झाले आहे.
या आढाव्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ग्राहकांनी वाढत्या महागाईच्या अपेक्षांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. महागाई तुलनेत कमी होत असल्याचे सर्वेक्षणातील सहभागींनी नमूद केले आहे. मात्र येत्या सहा महिन्यांत महागाई कमी होईल, असे ३० टक्के ग्राहकांनी नमूद केले आहे. यापूर्वी असे मत व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण अवघे २३ टक्के होते.
संशोधन व विश्लेषक वित्तीय संस्थेचा हा ग्राहक आढावा देशातील विद्यमान खर्च कल प्रदर्शित करतो. शहरी भागातील महागाई अंदाज आणि ग्राहकांची मानसिकताही यामार्फत सूचित होते. ताज्या अंदाजाच्या जोरावर येत्या काही महिन्यांत ग्राहक आढावा निर्देशांक ५० या आशादायक टप्पा आकडय़ापर्यंत जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
ग्राहकांचा आशावाद हा देशांतर्गत खर्च वाढून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास प्रोत्साहित करणारा ठरेल, असेही ‘झायफिन’चे मुख्य अर्थतज्ज्ञ देबोपाम चौधरी यांनी म्हटले आहे. विकासाबाबत भाष्य करताना वित्तीय संस्थेने म्हटले आहे, की महानगरातील निर्मिती क्षेत्राच्या वाढीने शहरांचा विकास दर वर्षभरात ६ टक्क्य़ांवरून थेट १७ टक्क्य़ांवर गेला आहे.

२०१५ मध्ये १०.६% वेतनवाढ
आशादायक अर्थव्यवस्थेत कर्मचाऱ्यांच्या पदरीही चालू वर्षांत अधिक रक्कम पडणार असल्याचे आघाडीच्या मनुष्यबळ सल्लागार कंपनीने म्हटले आहे. देशातील १० पैकी ७ कंपन्या, संस्था या २०१५ मध्ये व्यावसायिकदृष्टय़ा सुधारणा अपेक्षित करत असून, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देण्यापर्यंत होऊ शकतो, असे ‘एऑन हेविट’ने म्हटले आहे. गेल्या वर्षांत सरासरी १०.४ टक्के वेतनवाढ झाली असताना यंदा ती १०.६ टक्के राहण्याचा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे.