मालमत्तांच्या किंमती वधारत्या राहूनही भारतीय गृहवित्त बाजारपेठ ही १७ ते १९ टक्के वेगाने वाढेल, असे भाकित ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने केले आहे. असे असले तरी चालू पहिल्या अर्धवार्षिकात गृहकर्ज थकबाकी १० टक्क्यांनी वधारली आहे, असेही संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘इक्रा’ या भारतीय पतमानांकन संस्थेने सोमवारी येथे जाहीर केलेल्या या अहवालात घरांच्या, जागांचे दर वधारते राहूनही खरदी-विक्रीचे व्यवहार वाढले असल्याचे म्हटले आहे. बँकांकडून सध्या सुरू असलेल्या व्याजदर सवलतीच्या वातावरणात देशातील गृहवित्त क्षेत्र २०१२-१३ मध्ये १९ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षांत भारतीय गृहवित्त बाजारपेठ १७ टक्क्यांनी वाढली होती. २०११-१२ मध्ये गृहकर्ज थकबाकी ६,२६,१०० कोटी रुपयांची नोंदविली गेली आहे. ती एप्रिल ते सप्टेंबर २०१२ दरम्यान १० टक्क्यांनी वाढली आहे.
खाजगी गृहवित्त कंपन्यांचे अनुत्पादक प्रमाण ०.७७ टक्के असून राष्ट्रीयकृत बँकांचे प्रमाण १.६७ टक्के राहिले आहे. गृहवित्त पुरवठय़ामध्ये अर्थातच बँकांचा हिस्सा सर्वाधिक, ६५ टक्के आहे. त्यातही भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहेत. या तीनही बँकांचा हिस्सा मार्च २०१२ अखेर ४८ टक्के राहिला आहे. गृहवित्त कंपन्यांकडे गृहकर्जासाठी असलेली मागणी येत्या पाच वर्षांत २५ टक्क्यांनी वधारेल, असे नमूद करतानाच यासाठी त्यांना अधिक भांडवलाची गरज भासेल, असे अहवालात सांगण्यात आले आहे. अशा लागणाऱ्या ४४,००० कोटी रुपये रकमेपैकी २७,००० कोटी रुपये हे या कंपन्या अंतर्गत भांडवल उभारणीतून जमा करतील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home loan defaulters gone up by
First published on: 04-12-2012 at 12:20 IST