ब्रिटन सुरक्षित असल्याची मत = कर्जफेडीसाठी तडजोडीसाठी तयार = राष्ट्रभक्तीची ग्वाही
मायदेशात आपल्यावर अनेक आरोप होत आहेत व अशा परिस्थितीत आपण परत येणार नाही, असे युनायटेड ब्रुअरीजचे माजी अध्यक्ष व उद्योगपती विजय मल्या यांनी सांगितले.
मल्या यांची किंगफिशर ही हवाई वाहतूक कंपनी यापूर्वीच बुडाली आहे. मल्या यांचा पासपोर्ट नुकताच परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केला आहे.
मल्या यांनी सांगितले, की कर्जदार बँकांशी किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या हवाई वाहतूक कंपनीसंदर्भात योग्य ती तडजोड केली जाईल. मला अटक करून किंवा पासपोर्ट रद्द करून त्यांना कुठलाही पैसा परत मिळणार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मी भारतात परत येणार आहे, पण तूर्त त्यासाठी स्थिती अनुकूल नाही. माझ्यावर बेफाम आरोप केले जात आहेत. माझा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. सरकार पुढे काय करणार आहे हे मला माहीत नाही. मी राष्ट्रभक्त भारतीय आहे. भारतीय तिरंग्याचा मला अभिमान आहे, पण सध्या माझ्या नावाने जी ओरड चालू आहे ती पाहता सध्या ब्रिटनमध्ये राहणेच सुरक्षित आहे. भारतातील वातावरण लक्षात घेणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे फार मोठी भूमिका जनमत तयार करण्यात पार पाडत आहेतच, पण ते सरकारलाही माझ्याविरोधात चिथावणी देत आहेत.
मध्य लंडनमध्ये मेफेअर येथे चार तास दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की मी भारतात परत येणार आहे हे नक्की, पण आता त्यासाठी स्थिती अनुकूल नाही.
भारत सरकारने गुरुवारी ब्रिटनकडे मल्या यांना भारतात पाठवण्याची मागणी केली आहे. मल्या यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी आहे. मल्या हे २ मार्चला दिल्लीहून लंडनला गेले असून, त्यांनी भारतातील बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवले आहेत.
किंगफिशरचा निधी वळवल्याच्या संदर्भातील आरोपात मी दोषी नाही किंबहुना मालमत्ता खरेदी किंवा तत्सम आरोपातही काही गैर केले असे वाटत नाही असे सांगून ते म्हणाले, की माझी जरी चौकशी केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. किंगफिशर प्रकरणात बँकांशी तडजोड करण्यास माझी तयारी आहे.
तुमच्यामागे नोकरशाह लागले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की माझा पासपोर्ट आधी स्थगित व नंतर रद्द केला. पासपोर्ट स्थगित केल्याचा आदेश गेल्या आठवडय़ात सार्वजनिक सुटीच्या दिवशी काढला त्याला मी उत्तर दिले. ते विचारात घेतले नाही व शनिवारी पासपोर्ट रद्द करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला अटक करून कुठलाही पैसा परत मिळणार नाही. माझ्या नावाने सुरू असलेली ओरड पाहता सध्या ब्रिटनमध्ये राहणेच सुरक्षित आहे. माध्यमे सरकारलाही माझ्याविरोधात चिथावणी देत आहेत. मी दोषी नाही किंबहुना मालमत्ता खरेदी किंवा तत्सम आरोपातही काही गैर केले असे वाटत नाही.
– विजय मल्या, यूबी समूह अध्यक्ष.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am in forced exile no plans to return to india mallya
First published on: 30-04-2016 at 03:41 IST