पीटीआय, नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील प्रतिकूल आर्थिक धक्के पचवत भारतीय अर्थव्यवस्था मजबूतपणे मार्गक्रमण करत असल्याने ‘जागतिक बँके’ने भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ६.९ टक्क्यांवर जाईल, असा ‘जागतिक बँके’ने सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. याआधी अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने प्रगती करेल, असे तिचे अनुमान होते. सरलेल्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेची गती अपेक्षेपेक्षा चांगली राहिल्याने तिने आपल्या आधीच्या अनुमानात बदल करून त्यात ४० आधारबिंदूची भर घातली आहे. अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये ६.३ टक्क्यांचा वृद्धीदर नोंदविल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकतेच जाहीर केले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांनी विस्तारली होती. प्रामुख्याने निर्मिती आणि खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे विकासदराला खीळ बसली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर उसळलेली महागाई आणि ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेल्या व्याज दरवाढ अशा   आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने प्रथमच आर्थिक विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेने सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा अंदाज ७.५ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर आणला होता. जागतिक पातळीवरील बिघडत चाललेले बाह्य वातावरण भारताच्या विकासाच्या संभाव्यतेवर परिणाम करेल. मात्र इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या स्थितीत आहे, असे जागतिक बँकेने ‘वादळातून मार्गक्रमण’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in growth rate forecast from world bank ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST