राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईवर सूचिबद्ध असलेल्या तीन बडय़ा उद्योग समूहांतील कंपन्यांच्या कामगिरीचा एकत्रित पट मांडणारे स्वतंत्र निर्देशांक यापुढे गुंतवणूकदारांपुढे येतील.
टाटा समूह, आदित्य बिर्ला समूह आणि महिंद्र समूह यांचे हे निर्देशांक अर्थातच यापुढे सेन्सेक्स आणि निफ्टीप्रमाणे त्या त्या समूहातील कंपन्यांच्या समभागांची बाजारातील चढ-उतारांबाबत संवेदनशीलता दाखवीत वर-खाली होतील आणि परस्परांशी स्पर्धाही करतील.
टाटा समूहातील २५ कंपन्यांचे प्रतिनिधित्व ‘निफ्टी टाटा ग्रुप इंडेक्स’ करील. या २५ कंपन्यांचे बाजारमूल्य ७,५१,१६० कोटी रुपये असून एनएसईच्या एकूण बाजारमूल्यात ७.८३ टक्के हिस्सा राखतात. शिवाय यापैकी १० घटकांच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत तरल मुक्त बाजार भांडवलाच्या आधारे ‘निफ्टी टाटा ग्रुप २५ टक्के कॅप’ असा अतिरिक्त निर्देशांकही प्रस्तुत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला समूहातील ७ उद्योग क्षेत्रांतील ८ कंपन्यांचा ‘निफ्टी आदित्य बिर्ला ग्रुप इंडेक्स’ आणि महिंद्र समूहातील ६ उद्योग क्षेत्रांतील ७ कंपन्यांचा ‘निफ्टी महिंद्र ग्रुप इंडेक्स’ सुरू केला गेला आहे. या उद्योग समूहातील कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य अनुक्रमे २,०८,१७० कोटी रु. आणि १म्,६४,५८० कोटी रु. असे असून त्यांचे एनएसईच्या बाजारमूल्यात अनुक्रमे २.१७ टक्के व १.७१ टक्के अशी हिस्सेदारी आहे.
इंडिया इंडेक्स सव्र्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लि. या एनएसईच्या उपकंपनीने या निर्देशांकांची रचना केली आहे. अन्य उद्योग समूहांचे असे प्रातिनिधिक निर्देशांक बनविण्याची योजना असल्याचे या कंपनीचे मुख्याधिकारी मुकेश अगरवाल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent nifty valuation by tata birla mahindra
First published on: 17-12-2015 at 03:17 IST