नवी दिल्ली : सरलेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांत म्हणजेच, एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दम्यान वित्तीय तूट संपूर्ण वर्षांच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत ८२.७ टक्क्यांवर पोहोचली आहे.  सरकारच्या खर्चात वाढ झाली असली तरी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून केंद्र सरकारचे महसुली उत्पन्नही वाढत आहे. परिणामी, तूट आटोक्यात असल्याचे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

गेल्या आर्थिक वर्षांत, वित्तीय तूट म्हणजेच सरकारचा खर्च आणि महसुली उत्पन्न यांच्यातील तफावत २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकाच्या ७६ टक्के राहिली होती. फेब्रुवारी २०२२ पर्यंत केंद्र सरकारला महसुलापोटी १८.२७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत, तर याच काळात सरकारचा एकूण खर्च ३१.४३ लाख कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे वित्तीय तूट फेब्रुवारीअखेर १३,१६,५९५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 

केंद्र सरकारला ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट जीडीपीच्या ६.९ टक्के म्हणजेच १५.९१ लाख कोटी रुपये राहील अशी अपेक्षा असून, ही मर्यादा २०२१-२२ आर्थिक वर्षांतही ओलांडली जाणार नाही, असे चित्र आहे.

एकूण खर्च      ३१.४३ लाख कोटी

महसुली उत्पन्न १८.२७ लाख कोटी

वित्तीय तूट     १३.१६ लाख कोटी