१०० अब्ज डॉलरच्या इटलीच्या फियाट समूहाचा भाग असलेल्या ‘केस कन्स्ट्रक्शन’ने भारतातील वाटचाल स्वतंत्र करण्याचे ठरविले असून मध्य प्रदेशातील निर्मिती प्रकल्प हा एकूण आशियासाठी ‘निर्मिती हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार केला आहे.
पायाभूत सेवा क्षेत्रासाठी लागणाऱ्या वाहन- उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘केस कन्स्ट्रक्शन’च्या मध्य प्रदेशमधील प्रकल्पाची निर्मिती क्षमता सध्या वार्षिक ७,५०० वाहने आहे. कंपनी येत्या नवी वाहने तयार करण्याबरोबरच अन्य विविध आशियाई देशांमध्ये निर्यात करणार आहे.
फियाटमध्ये सध्या जगभरातील २ लाख मनुष्यबळ कार्यरत आहे. तर सहा महिन्यांपूर्वी खास भारतासाठी अस्तित्वात आलेल्या ‘केस न्यू हॉलंड कन्स्ट्रक्शन इक्विपमेन्ट (इंडिया) प्रा. लि.मध्ये तूर्त ९०० हून अधिक कर्मचारी आहेत. देशातील विस्तारासाठी कंपनीने मुंबई उपनगरात भरलेल्या उपकरण प्रदर्शनात आपली वाहनेही सादर केली होती. ‘केस’साठी इंजिन सहकार्य ‘फियाट’कडून यापुढेही कायम राहणार आहे.
केस कंपनी भारतीय लोडर वाहन – उपकरण क्षेत्रात क्रमांक एकची कंपनी आहे. तर बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या कॉम्पॅक्टर प्रकारच्या वाहनांमध्ये कंपनीचा ३० टक्के बाजारहिस्सा आहे. कंपनी येत्या दोन वर्षांसाठी २.४ कोटी डॉलरची नव्याने गुंतवणूक करत आहे. डिसेंबर २०१३ पर्यंत आणखी दोन ते तीन तर येत्या दोन वर्षांत विविध आठ वाहन – उपकरणे बाजारात आणण्याचा मनोदय ‘केस कन्स्ट्रक्शन’च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक अनिल भाटिया यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला.
३.५ अब्ज डॉलरची भारतातील पायाभूत क्षेत्राची बाजारपेठ वेगाने विकसित होत असल्याचे नमूद करून केंद्र सरकारच्या पंचवार्षिक योजनेतही या क्षेत्रासाठी १२० अब्ज डॉलरची तरतूद करण्याकडे भाटिया यांनी लक्ष वेधले. हे क्षेत्र येत्या दोन ते तीन दशकांमध्ये वार्षिक २० ते २५ टक्के वाढीसह वाटचाल करेल, असेही ते म्हणाले. या क्षेत्रात सध्या किमान एक कोटी रुपयांपासून विविध ७५० हून अधिक वाहन – उपकरण प्रकार आहेत.
कंपनीच्या वाहन विक्री तसेच सेवा केंद्रांची संख्या डिसेंबर २०१३ पर्यंत २२० च्या पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेशातील प्रकल्प विस्तारित करण्याच्या हेतूने आवश्यक कर्मचारी भरती तसेच वाहन निर्मिती क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘केस कन्स्ट्रक्शन’साठी भारत ठरणार निर्मिती ‘हब’
१०० अब्ज डॉलरच्या इटलीच्या फियाट समूहाचा भाग असलेल्या ‘केस कन्स्ट्रक्शन’ने भारतातील वाटचाल स्वतंत्र करण्याचे ठरविले असून मध्य प्रदेशातील निर्मिती प्रकल्प हा एकूण आशियासाठी ‘निर्मिती हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार केला आहे.
First published on: 28-03-2013 at 12:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will be creative hub for case construction