दिवसभरात २६० अंशांपर्यंत झेप घेणारा भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक- सेन्सेक्सने मंगळवार दिवसअखेर अवघ्या ८८ अंशांच्या कमाई केली असली तरी गेले काही दिवस सलगपणे सुरू असलेल्या पडझडीतून त्याने दिलासादायी उसंत घेतली. उल्लेखनीय म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाही मंगळवारी काहीसा सावरलेला दिसला.  दिवसअखेर सेन्सेक्स १८,८०२.३१ वर बंद झाला, तर १८.८५ अंश वाढीसह निफ्टी ५,६०९.१० वर स्थिरावला.
चीनसह एकूणच अस्थिर अशा आशियाई बाजारावर प्रतिक्रिया नोंदवीत मुंबई शेअर बाजारानेही दिवसाच्या सुरुवातीला काहीशी नरम वाटचाल केली. तथापि तेजीसह खुले होणाऱ्या युरोपीय बाजारातील वाटचालीतून उत्साह मिळवीत कालच्या तुलनेत २६० अंशांची वाढ नोंदवीत सेन्सेक्स मध्यान्हीला १८,८०२.३१ पर्यंत झेपावला होता. मात्र शेवटच्या अर्धा तासात नफावसुलीचे ग्रहण लागून ही वाढ ८८ अंशांवर रोडावली.
भारती एअरटेल, ओएनजीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, आयटीसी, रिलायन्स, एचडीएफसी बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोसारख्या कंपन्यांच्या समभागांना शेवटच्या क्षणी मागणी नोंदविली गेल्याने सेन्सेक्स किरकोळ तेजीसह बंद झाला.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत ६० नजीक गेलेला रुपया मंगळवारी काहीसा सावरला. अवघ्या दोन पैशांनी वधारत रुपया ५९.६६ पर्यंत उंचावला. दिवसाच्या सुरुवातीलाच ५९.६४ पर्यंत वधारणारा रुपया ५९.७९ पर्यंत खालावला होता. अखेर त्याने किरकोळ वाढीसह कालच्या ऐतिहासिक नीचांकापासून उभारी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिनी समभागांचा पालापाचोळा!
शांघाई : चीनमधील बँकिंग क्षेत्र अरिष्टाच्या उंबरठय़ावर पोहोचले असल्याच्या भीतीने तेथील शेअर बाजारात पडझडीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. चीनचा प्रमुख शेअर बाजार शांघाई स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकात सोमवारच्या ६.३ टक्क्यांच्या घसरणीत, आज बाजार उघडताच आणखी ६ टक्क्यांची भर पडली. गुंतवणूकदारांकडून समभागांच्या विक्रीचे वादळ लोटल्याने झालेल्या या पडझडीत शांघाई निर्देशांक साडेचार वर्षांपूर्वीच्या म्हणजे जानेवारी २००९ च्या पातळीवर रोडावला. चीनची मध्यवर्ती बँक ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने अनौपचारिक ऋण व्यवहारात गुंतलेल्या संस्थांच्या बंदोबस्ताचे आणि रोखता निर्माण करण्याच्या दृष्टीने आश्वासक विधाने केल्याने मंगळवारी शांघाई निर्देशांक अवघ्या ०.३ टक्के नुकसानीसह दिवसअखेर स्थिरावला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian rupee marginally stronger against us dollar up 4 paise
First published on: 26-06-2013 at 12:07 IST