पंचविशीखालील युवक-कुमारवयीन व बालकांचा लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या भारतात खेळणी आणि खेळ-सामग्रीची बाजारपेठ प्रचंड मोठी असणे स्वाभाविकच असले तरी या बाजारपेठेवर विदेशातून, प्रामुख्याने चीनमधून, आयात होणाऱ्या खेळणी आणि क्रीडासामग्रीचा वरचष्मा आहे. देशातील पारंपरिक खेळणी निर्मात्यांनी कात टाकून नव्या ऊर्जेने मुसंडी मारणे ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही मोठा आधारस्रोत बनू शकेल.
भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश असण्याबरोबरच, देशाची क्रीडा संस्कृती समृद्ध व पुरातन परंपरा असलेली आहे. परंतु भारताच्या ४०० दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या घरात जाणाऱ्या खेळण्यांच्या बाजारपेठेत भारतातून निर्मित खेळण्यांची विक्री ही ४० टक्के तर विदेशातून मुख्यत: चीनमधून आयात होणाऱ्या खेळण्यांची विक्री ही ६० टक्क्यांच्या घरात जाणारी आहे. लक्षणीय म्हणजे देशातील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही बाजारवर्गात या विदेशी खेळण्यांचा मोठा वाटा आहे, अशी माहिती ‘ऑल इंडिया टॉय मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे अध्यक्ष विवेक जांगियानी यांनी दिली.
एकीकडे भारत सरकारकडून ‘एसजीईपीसी’सारख्या योजना प्रायोजित करून खेळाचे साहित्य आणि खेळणी यांमध्ये भारतीय निर्यातीच्या विकासासाठी प्रोत्साहनाचा प्रयत्न सुरू असताना, देशी बाजारपेठेत मात्र विदेशी खेळण्यांचे अधिराज्य, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. देशांतर्गत काही खेळणी निर्मात्यांना विदेशातूनही चांगली मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात सध्या सर्वाधिक मागणी ही शैक्षणिक खेळणी आणि तत्सम क्रीडा प्रकारांना असून, या बाजारवर्गात भारताच्या पारंपरिक खेळणीनिर्मात्यांना मोठा वाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगभरच्या खेळणी निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पिलवेअरन्मेसे ईजी या जर्मनीस्थित संघटनेचे मुख्याधिकारी अर्न्स्ट किक यांच्या मते भारतीय खेळणी उद्योगातील विक्री सध्या आगामी वृद्धी सामर्थ्यांसोबत लक्षणीय विकासाची साक्ष देणारी निश्चितच आहे. अनेक जागतिक आघाडीचे खेळणी निर्माते भारताकडे संयुक्त भागीदारी प्रकल्प अथवा थेट विदेशी गुंतवणुकीच्या मार्फत अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. याच घडामोडींची दखल घेत, स्पिलवेअरन्मेसे आणि इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सने येत्या २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ‘किड्स इंडिया’ या जगभरातील खेळणी निर्मात्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात सर्वासाठी खुल्या असलेल्या या प्रदर्शनात एकूण १०८ प्रदर्शक खेळण्यांच्या १३८ नाममुद्रांसह सहभागी होत आहेत. भारतातील बिहार, विशाखापट्टणम येथील काही पारंपरिक लाकडी खेळणी निर्मात्यांचीही या प्रदर्शनात खास दालने असतील.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2013 रोजी प्रकाशित
पारंपरिक खेळणी उद्योगाला नवसंजीवनी आवश्यक
पंचविशीखालील युवक-कुमारवयीन व बालकांचा लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या भारतात खेळणी आणि खेळ-सामग्रीची बाजारपेठ प्रचंड मोठी असणे
First published on: 23-10-2013 at 12:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian traditional toys industry need new life saving plan