‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या वेबसंवादात तज्ज्ञांकडून गुंतवणूक मंत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गुंतवणूक कशासाठी ते लक्ष्य नेमके ठरवून, गुंतवणुकीतील सातत्य, गुंतवणुकीचा नियमित आढावा घेऊन फेरबदल या घटकांवर लक्ष देऊन केलेली गुंतवणूक सदासर्वदा आणि कोणत्याही बाजार परिस्थितीत यशस्वीच ठरते. गुंतवणुकीची रक्कम भलेही कितीही कमी असली तरी लवकरात लवकर गुंतवणुकीचा श्रीगणेशा मात्र करायला हवा, असा कानमंत्र मंगळवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या वेबसंवादातून तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिला.

आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमांतर्गत आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत कार्यक्रम दूरचित्रसंवाद माध्यमातून आणि लोकसत्ता वाचकांच्या मोठय़ा सहभागासह मंगळवारी सायंकाळी पार पडला. योग्य गुंतवणूक पर्यायांची साथ मिळविल्यास महागाईचा आगडोंब असतानाही, त्यावर मात करणारा परतावा मिळविता येऊ शकतो, असे सोदाहरण पटवून देणारे मार्गदर्शन अर्थअभ्यासक आणि गुंतवणूक नियोजनकार कौस्तुभ जोशी यांनी केले. क्वांटम म्युच्युअल फंडाचे उपाध्यक्ष (ग्राहक-संवाद) संदीप भोसले यांनी सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत गुंतवणुकीतील जोखमीबाबत दक्षतेचा पैलू उलगडून दिला. दोन्ही तज्ज्ञ वक्त्यांनी श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही केले. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक गौरव मुठे यांनी वक्ते व श्रोत्यांमधील दुवा आणि सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.

आर्थिक उद्दिष्ट पक्के करून, दीर्घकालीन, जितकी जमेल तितकी परंतु सातत्यपूर्ण गुंतवणूक करीत राहणे महत्त्वाचे आहे. थेट समभाग की म्युच्युअल फंड यापैकी कोणता पर्याय निवडावा, हे ठरलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उपलब्ध कालावधी आणि तुमचे वय यावर अवलंबून असेल. म्हणजे तुमच्यावरील आर्थिक जबाबदाऱ्या आणि जोखीम उचलण्याची तुमची क्षमता यानुसार कुठे पैसा घालायचा हे ठरविले जाईल. यात बँक मुदत ठेवी, सोने, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी, एनपीएस यासारख्या पर्यायांचे महत्त्व आहे, असे कौस्तुभ जोशी यांनी अधोरेखित केले.

शेअर बाजारात पैसा घालताना, गुंतवणूकदार होणार की ट्रेडर बनणार याचा निर्णय केला जायला हवा. दोन्हींसाठी विशिष्ट पातळीचे ज्ञान मिळविणे, काही विशिष्ट तंत्र आणि कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे, हेही लक्षात घेतले जायला हवे. स्वत: अभ्यास करण्याची तयारी आणि वेळ नाही अशा मंडळींनी म्युच्युअल फंडांसारखा सुलभ आणि व्यावसायिक तज्ज्ञतेवर चालणाऱ्या पर्यायाचा आधार घ्यावा आणि तज्ज्ञ सल्लागाराच्या साहाय्याने गुंतवणुकीचा निर्णय घेणे हितावह ठरेल, असे जोशी यांनी सांगितले.

दीर्घकालीन संपत्ती निर्माणाच्या साधनासंबंधी जागरूकता वाढणे काळाची गरज असून, त्या अंगाने ‘लोकसत्ता अर्थसल्ला’सारखे कार्यक्रम हे लोकांशी संवादाचे उत्तम व्यासपीठ ठरते. या वेबसंवादातील एकंदर सहभाग आणि विचारले गेलेले प्रश्न पाहता लोकांमध्ये उत्सुकता जबरदस्त असल्याचे स्पष्टपणे दिसते. गुंतवणुकीचे पाऊल टाकण्यापूर्वी जोखमीबाबत पुरेपूर जाण आणि आवश्यक ती दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे.

– संदीप भोसले, उपाध्यक्ष (ग्राहक-संवाद),  क्वांटम म्युच्युअल फंड

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment tips from experts through web conversion in loksatta arthasalla event zws
First published on: 08-06-2022 at 02:35 IST