‘इक्विटी’ म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ जुलैमध्ये निम्म्यावर

सरलेल्या जुलै महिन्यात इक्विटी फंडांतील ओघ जवळपास निम्म्याने म्हणजे ४३ टक्क्यांनी गडगडून ८,८९८ कोटी रुपयांवर सीमित राहिला.

‘इक्विटी’ म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ जुलैमध्ये निम्म्यावर
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची ताजी दौड पाहता भांडवली बाजारात तेजी परतत असल्याचे दिसत असताना, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी मात्र नफा पदरी बांधून घेण्यासाठी समभागसंलग्न (इक्विटी) फंडांची विक्री याच काळात केल्याचे, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अ‍ॅम्फी) सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. सरलेल्या जुलै महिन्यात इक्विटी फंडांतील ओघ जवळपास निम्म्याने म्हणजे ४३ टक्क्यांनी गडगडून ८,८९८ कोटी रुपयांवर सीमित राहिला.

जून, मे आणि एप्रिल अशा आधीच्या तीन महिन्यांत इक्विटी फंडांनी अनुक्रमे १५,४९५ कोटी रुपये, १८,५२९ कोटी रुपये आणि १५,८९० कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक आकर्षित केली आहे. जुलैमध्ये त्यात तीव्र स्वरूपाची घसरण झाली असली तरी गुंतवणुकीचा प्रवाह सकारात्मक राहण्याचा हा सलग १७ वा महिना आहे. मार्च २०२१ पासून गुंतवणूकदारांचा इक्विटी फंडांतील आस्था कायम असून, ती उत्तरोत्तर वाढत आली आहे. त्याआधी जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ या सलग आठ महिन्यांत गुंतवणूकदारांनी पाठ केल्याने, इक्विटी फंडांमधून ४६,७९१ कोटी रुपयांची निर्गुतवणूक झाली होती.

इक्विटी फंडांच्या सर्वच वर्गात सरलेल्या जुलैमध्ये नक्त गुंतवणूक वाढली आहे. ‘स्मॉल कॅप फंड’ वर्गाने सर्वाधिक १,७८० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून अग्रक्रम राखला. त्याखालोखाल फ्लेक्सी कॅप फंडात १,३८१ कोटी रुपये, तर लार्ज कॅप फंड, लार्ज अँड मिड कॅप फंड आणि मिड कॅप फंडात प्रत्येकी १,००० कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणुकीचा नक्त ओघ राहिला.

रोखेसंलग्न अर्थात डेट फंडांनीदेखील सरलेल्या जुलै महिन्यांत ४,९३० कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक आकर्षित केली. आधीच्या जून महिन्यात डेट फंडांतून तब्बल ९२,२४७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. जुलैमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांतून (गोल्ड ईटीएफ) ४५७ कोटी रुपयांची निर्गुतवणूक झाली. मागील महिन्यांत मात्र या फंडांनी १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली होती. एकंदरीत म्युच्युअल फंड उद्योगाने जुलैमध्ये २३,६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली, त्याउलट आधीच्या जूनमध्ये मुख्यत: डेट फंडांमधील मोठय़ा निर्गुतवणुकीमुळे, एकूण म्युच्युअल फंड मालमत्तेला ६९,८५३ कोटी रुपयांची गळती लागली होती.

एकूण गंगाजळी ३७.७५ लाख कोटींवर

इक्विटी आणि डेट फंडांतील सकारात्मक ओघामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (एयूएम) जुलैअखेर ३७.७५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. जूनअखेर तिची पातळी ३५.६४ लाख कोटी रुपये अशी होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Gold-Silver Price on 8 August 2022: सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचा भाव काय?
फोटो गॅलरी