रस्ते विकास क्षेत्रातील अग्रणी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.ने देशातील पहिल्या पायाभूत गुंतवणूक विश्वस्त कोशाच्या अर्थात इन्व्हिट फंडाची उभारणी प्रस्तावित केली. यातून आयआरबीला दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज भागविली जाण्याबरोबरच, पूर्णत्वास गेलेल्या आपल्या काही प्रकल्पांतून निरंतर आर्थिक लाभ मिळविता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पहिल्यावहिल्या इन्व्हिट फंडाची विक्री येत्या ३ मेपासून सुरू होणार असून, ती ५ मेपर्यंत सुरू राहील. प्रत्येकी १०० रु. ते १०२ रुपये असा किंमत पट्टा निर्धारित करण्यात आलेल्या या भागविक्रीतून एकंदर ५,०३५ कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. या विश्वस्त कोशाची आयआरबीच्या सध्या कार्यरत सहा बांधा, वापरा आणि हस्तांतरित (बीओटी) तत्त्वावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते प्रकल्पात १०० टक्के मालकी निर्माण होईल. आयआरबीकडे ३१ डिसेंबर २०१६ अखेपर्यंत १६ कार्यरत प्रकल्प असून, पाच बांधकामाधीन प्रकल्प तर तीन प्रकल्प प्रारंभिक विकास अवस्थेत आहेत.

तर प्रारंभिक विक्रीतून मिळणाऱ्या निधीचा मोठा हिस्सा ३,३५० कोटी रुपये हे या प्रकल्पांसाठी स्थापित विशेष हेतू कंपन्यांच्या (एसपीव्ही) कर्जफेडीसाठी, तर सुमारे १,७०० कोटी रुपये या कोशाचे प्रवर्तक म्हणून आयआरबी इन्फ्राच्या कर्ज परतफेडीसाठी केला जाईल. या १,७०० कोटी रुपयांच्या योगदानातून कंपनीचे कर्ज-भांडवल गुणोत्तर लक्षणीयरीत्या सुधारेल, असे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी सांगितले.

चांगल्या परताव्याची गुंतवणूक संधी

इन्व्हिट अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट फंड हे ‘सेबी’ने तिच्या कायद्यात दुरुस्तीन्वये मंजुरी दिलेले नवीन ऋण धाटणीचा (डेट) गुंतवणूक प्रकार आहे. ज्याच्या एककांना भांडवली बाजारात सूचिबद्ध केले जाऊन त्याचे अन्य रोख्यांप्रमाणे नियमित व्यवहार सुरू होतील. पायाभूत प्रकल्पांच्या प्रवर्तकांसाठी गुंतवणुकीचा स्रोत म्हणून हा विश्वस्त कोश वापरात येईल, तर गुंतवणूकदारांसाठी त्यांचे प्रकल्प हे चलनी फायद्याचे स्रोत बनतील. या पहिल्या इन्व्हिट फंडातून म्युच्युअल फंड, बँका व विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांना सरासरी १२ टक्के दराने तर किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांना १० टक्के दराने परताव्याची अपेक्षा करता येईल, असा म्हैसकर यांचा कयास आहे.

गुंतवणूक कशी?

म्युच्युअल फंडात सामान्यपणे होणाऱ्या गुंतवणुकीप्रमाणे, व्यक्तिगत गुंतवणूकदारांना (रिटेल) या इन्व्हिट फंडासाठी १०२ रु. दराने बोली लावता येईल. तथापि किमान १०,००० युनिट्ससाठी (किमान गुंतवणूक १० लाख २० हजार रुपये) अर्ज करावा लागेल आणि त्यापुढे ५,००० युनिट्सच्या पटीत या फंडात गुंतवणूक करता येईल. विक्रीपश्चात हे युनिट्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध केले जातील आणि समभागांप्रमाणे त्यांचे व्यवहार होत राहतील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irb infra invite open for initial sale
First published on: 26-04-2017 at 01:04 IST