ज्यासाठी आयुष्य घालविले ते सर्व उद्ध्वस्त झाले, असे उद्विग्न उद्गार ५,६०० कोटी रुपयांचा घोटाळा झालेल्या ‘एनएसईएल’चे मुख्य प्रवर्तक जिग्नेश शाह यांनी गुरुवारी काढले. शाह यांनी अग्रणी वस्तू वायदे बाजार ‘एमसीएक्स’चाही राजीनामा दिला आहे.
एनएसईएल तसेच एमसीएक्सची मुख्य प्रवर्तक फायनान्शियल टेक्नॉलॉजीजचे सर्वेसर्वा असलेल्या शाह यांनी एमसीएक्सच्या बिगर कार्यकारी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या पाश्र्वभूमीवर त्यांनी ‘एनएसईएलमुळे मी कमावलेले सारे काही गमावले’ अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले. गेली दोन दशके मी खूप मेहनत घेतली. आयुष्यात जेवढे काही मी केले ते सारे गमावले. माझे केवळ आर्थिक नुकसान झाले नाही तर माझी विश्वासार्हताही संपुष्टात आली आहे.
जिग्नेश शाह यांच्यासह जोसेफ मॅसी, अटकेत असलेल्या अंजनी सिन्हा यांची बँक खाती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाने बुधवारी गोठविली आहेत.