मुंबईस्थित मुख्यालय असलेल्या व २००४ मध्ये स्थापित झालेल्या कोटक महिंद्र बँकेच्या सध्या देशभरात एकूण ६०५ शाखा असून १,१०३ एटीएम आहेत. तर बंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या आयएनजी वैश्य बँकेच्या ६७७ शाखा ताज्या व्यवहारानंतर तिच्या ताब्यात येतील. दोन्ही बँका दक्षिण भारतात प्राबल्य असलेल्या आयएनजी वैश्य बँकेच्या ६६ टक्के शाखा या भागात आहेत. तर कोटक महिंद्र बँकेच्या ६८ टक्के शाखा या प्रामुख्याने पश्चिम व उत्तर भारतात आहे. या विलीनीकरणामुळे कोटक महिंद्रला देशव्यापी अस्तित्व निर्माण करता येईल. तर लघू व मध्यम उद्योगाची अवघी ८ टक्के खाती असणाऱ्या कोटक महिंद्रला या रूपाने आयएनजी वैश्यची या क्षेत्रातील ३८ टक्के खाती प्राप्त होणार आहेत.
दोन्ही बँका भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत. आयएनजी वैश्य बँकेत नेदरलँडच्या आयएनजीचा ४२.७३ टक्के हिस्सा आहे. आयएनजी वैश्य बँकेत तूर्त एकूण ७१ टक्के तर कोटक महिंद्र बँकेत ४२ टक्के विदेशी मालकी आहे. विलीनीकरणानंतर कोटक मिहद्रमधील प्रवर्तकांचा हिस्सा ३४ टक्क्यांवर येणार आहे.