परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीत उतरलेल्या महिंद्र समूहाने महाराष्ट्रातील पहिल्या प्रकल्पाची घोषणा गुरुवारी केली. यानुसार ‘हॅप्पीनेस्ट’ नाममुद्रेंतर्गत कंपनीचा राज्यातील हा प्रकल्प नवनिर्मित पालघर जिल्ह्य़ातील बोईसर येथे साकारण्यात येणार आहे.
वर्षभरात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ३५९ घरे तयार करण्यात येणार असून यामध्ये वन रुम किचन, वन बीएचके तसेच टू बीएचके आकारातील फ्लॅट हे एक अधिक चार मजली इमारतीत असतील.
३५१ ते ६९५ चौरस फूट आकारातील या घरांच्या किमती ९.१० ते १७.५ लाख रुपयां दरम्यान असतील. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकापासून १० मिनिटे व उमरोळी रेल्वे स्थानकापासून २.५ किलो मीटरवरील १४ एकर जागेत हा प्रकल्प आहे.
बोईसर भागात ‘हॅप्पीनेस्ट’ हा गृहनिर्माण प्रकल्प तीन टप्प्यात साकारणार असून याद्वारे १,४०० घरांची निर्मिती होईल, अशी माहिती ‘महिंद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स’च्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता अर्जुनदास यांनी दिली.
कंपनीचा गृहनिर्माण प्रकल्प हा मुंबई गुजरात रेल्वे तसेच रस्ते मार्ग तसेच येऊ घातलेल्या दिल्ली – मुंबई औद्योगिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे; या भागात विविध १,५०० हून प्रकल्प असून एक लाखांहून अधिक रोजगार आहे, असे वैशिष्टय़ कंपनीच्या व्यवसाय विभागाचे प्रमुख श्रीराम महादेवन यांनी सांगितले.
‘हॅप्पीनेस्ट’ची सुरुवात कंपनीने जूनमध्ये केली असून या नाममुद्रेखाली पहिला प्रकल्प तामिळनाडूतील चेन्नईमध्ये सुरू करण्यात आला. येथे पहिल्या टप्प्यात ६०० घरे तयार करण्यात आली आहेत. शहरी भागात कमी उत्पन्न असणारी सध्या १.९० कोटी कुटुंबे ही झोपडय़ा अथवा भाडय़ाच्या घरात राहत असून २०३० पर्यंत ही संख्या ३.८० कोटी होणार आहे, असा अंदाज व्यक्त करत श्रीराम महादेवन यांनी बोईसरमधील ‘हॅप्पीनेस्ट’मध्ये वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. कंपनीमध्ये रेल्वे मार्गावरील वाशिंद आदी परिसरातही गृहनिर्मितीसाठी उत्सुक असल्याचेही ते म्हणाले. माफक दरातील घरनिर्मितीत यापूर्वी टाटा समूहाने चार ते सहा वर्षांपूर्वी  याच भागात गृहनिर्माण प्रकल्प साकारला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra enters affordable housing project in boisar
First published on: 10-10-2014 at 02:12 IST