आर्थिक आघाडीवर घेतल्या गेलेल्या काही दूरगामी निर्णयांबाबत अपेक्षित सकारात्मकता या आठवडय़ात बाजारावर दिसली आणि सेन्सेक्स सप्ताहअखेर २० हजारांची वेस दमदारपणे ओलांडताही झाला. माजी अर्थमंत्री आणि विद्यमान राष्ट्रपतींनी पी. चिदम्बरम यांच्यासाठी सोडलेला नकोसा वारसा अर्थात ‘गार’ या करविषयक वादग्रस्त तरतुदींना २०१६ पर्यंत गारपेटीत ठेवण्याचा धडाकेबाज निर्णय सोमवारी म्हणजे सप्ताहारंभीच आला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार ‘गार’च्या तडाख्यातून सुटणार ही गोड मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधूनच आली.
पुढे इन्फोसिसच्या तिमाहीतील निकालापेक्षा त्या कंपनीने आगामी काळाविषयी शुभसंकेत देणारे केलेले निर्देश बाजाराला भावले. मात्र इन्फोसिसपाठोपाठ टीसीएस, एचसीएल टेक या अन्य सॉफ्टवेअर कंपन्यांचे निकाल बाजाराच्या अपेक्षांवर खरे उतरणारे ठरले. पेट्रोलपाठोपाठ डिझेलच्या किमतींही सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निर्णयाने गेली दोन-अडीच वर्षे अडगळीत पडलेल्या तेल व वायू क्षेत्राला मोठी उभारी दिली. सरकारी तेल कंपन्यांनी आधी असा निर्णय होणार या अपेक्षेने आणि पुढे निर्णय झाल्यानंतरही आठवडाभरात जवळपास २५ टक्क्यांची वाढ दर्शविली. मुख्य म्हणजे निर्देशांकात मोठा भारांक असलेल्या रिलायन्स आणि ओएनजीसी या तेलक्षेत्रात कंपन्यांनी घेतलेल्या दमदार मुसंडीनेच सेन्सेक्स २० हजारांपल्याड जाऊ शकला म्हटल्यास वावगे ठरू नये. रिलायन्स इंडस्ट्रीज बऱ्याच कालावधीनंतर ९०० रुपयांच्या तर ओएनजीसी रु. ३५०च्या भावापाशी गेला आहे, ही वस्तुस्थितीच सारे काही स्पष्ट करते.
निर्गुतवणुकीच्या कार्यक्रमाबाबत सरकारचा गंभीर ध्यास दिसून येत आहे. मार्चपर्यंत दर पंधरवडय़ाला एक अशा तऱ्हेने सरकारी कंपन्यांतील हिस्सा विक्रीची योजना आखली गेली आहे. चालू महिन्यात त्याप्रमाणे ऑइल इंडियाच्या शेअर्सची विक्री होत आहे. पुढे फेब्रुवारी महिन्यात दोन कंपन्या, तर मार्चमध्ये आणखी दोन कंपन्यांमध्ये सरकारच्या भांडवलाची निर्गुतवणूक करण्याचा बेत आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी एकूण वाईट दिवस असले तरी स्वत: या क्षेत्रातील कंपन्यांनी कॉल दरात वाढीसंबंधी दाखविलेले गांभीर्य या कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजीला कारणीभूत ठरले आहेत.
आघाडीचे समभाग मोठी मुसंडी घेत असताना, मिडकॅप समभागांमध्ये या आठवडय़ात विक्री सुरू होती. रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या २९ जानेवारीला नेमके पतधोरण कसे असेल याचे उलटसुलट आडाखे बाजारात सुरू आहेत. प्रारंभीची अर्धा टक्के व्याजदर कपातीची शक्यता हळूहळू ओसरत पाव टक्क्यांवर आली आहे. बँकांचे समभाग मात्र त्या अपेक्षेने महिनाभर आधीच भाव खाताना दिसले आहेत. जवळपास सर्वच बँकांचे समभाग आताच वर्षांतील उच्चांकी भावावर आहेत. गोल्डमन सॅक्ससह अनेक विदेशी वित्तसंस्था व दलाल संस्थांनी भारतीय भांडवली बाजाराबाबत नवीन उच्चांकांचे भाकीते केली आहेत. विदेशी वित्तसंस्थांकडून निरंतर मिळत असलेले खरेदीचे पाठबळ हे त्याचे द्योतक आहेच. बऱ्याच विदेशी फंडांची बाजारातील अलीकडे गुंतवणूक वाढली आहे. दिग्गजांची नजर असलेला रिलॅक्सो फूटवेअर मागे ८०० रुपयांवर सुचविला होता, तो आता ९१६ रुपयांवर गेला आहे. भावातील अशी झेप अनेक मिडकॅप समभागांनी गेल्या सहा महिन्यात अनुभवली आहे आणि अनेक वाचकांना त्याचा लाभही नक्कीच झाला असेल.  
ज्यांनी वेळीच बाजारात प्रवेश केला असेल, त्यांनी नक्कीच फायदा कमावण्याचा काळ नजीक येऊन ठेपला आहे. पण तेजी दिसू लागल्यावर आता घाईघाईने गुंतवणूक करण्याचा वेडेपणा टाळणेच श्रेयस्कर ठरेल. अशा मंडळींना प्रवेशाची संधी नक्कीच मिळेल, पण थोडे सबुरीने घ्यावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market trick implementation of policy cause boom in sensex
First published on: 19-01-2013 at 12:31 IST