अनोखा टप्पा गाठलेल्या भांडवली बाजारात आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी तुफान नफेखोरी अवलंबिल्याने सेन्सेक्सने सोमवारी तब्बल ४३०.६५ अंशांची आपटी खाल्ली. मुंबई निर्देशांक २० हजाराखाली येतानाच तो दिवसअखेर १९,६९१.६७ वर येऊन ढेपाळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील त्याच्या ६ हजाराच्या टप्पापासून फारकत घेत सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सव्वाशे अंशाचे नुकसान करणारा ठरला. दोन्ही प्रमुख बाजारातील २ टक्क्यांहून अधिकच्या घसरणीने निर्देशांकाने २७ फेब्रुवारी २०१२ नंतरची सर्वात मोठी घट नोंदविली आहे. मुंबईच्या शेअर बाजाराने यापूर्वी सर्वात मोठी ४७८ अंशांची घसरण अडिच महिन्यांपूर्वी नोंदविली होती. या सर्वाचा परिपाक गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच सत्रात एक लाख कोटी रुपयांनी कमी होण्यात झाला. गेल्या काही दिवसांपासून सततच्या वधारणेने मुंबई निर्देशांक २० हजारावर तर राष्ट्रीय शेअर बाजार ६ हजारांवर पोहोचला होता. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कमी व्याजदर कपातीच्या निर्णयातूनही बाजार सावरला होता. विशेषत: विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भांडवली बाजारातील निधीचा ओघ कायम होता. सप्ताहाच्या प्रारंभीच मात्र त्याला खीळ बसली. सोमवारच्या मुंबई शेअर बाजाराच्या एकाच दिवसातील ४३० अंश घसरणीने यापूर्वीच्या २७ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या ४७८ अंशांच्या समीप स्थान मिळविले. एप्रिलमध्ये १० टक्क्यांखाली स्थिरावलेल्या किरकोळ महागाई दराकडेही गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. त्याचबरोबर वाढत्या व्यापार तुटीचा दबाव बाजारातील समभाग विक्रीच्या धोरणावर चांगलाच जाणवला. शिवाय सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकही ३.१७ टक्क्यांच्या घसरणीसह नकारात्मक यादीत मोडले. सेन्सेक्समधील सर्व ३०ही समभागांचे मूल्य खालावले. यामध्ये रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एल अ‍ॅन्ड टी यांचाही क्रम लागला. आयटीसीतील घसरण ५ टक्क्यांची तर भारती एअरटेलसारख्या समभागांची घट ४ टक्क्यांपर्यंतची होती. चार शतकांच्या आपटीने गुंतवणूकदारांच्या खिशालाही एक लाख कोटी रुपयांची चाट पडली. तीन पैकी एक समभाग घसरणीचा क्रम राखणाऱ्या मुंबईच्या शेअर बाजारात आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची मालमत्ता ६७,०३,३८८.५९ कोटी रुपयांवर येऊन ठेपली. २० हजारापुढे गेलेला मुंबई शेअर बाजार शुक्रवापर्यंत गेल्या तीन महिन्याच्या उच्चांकावर होता. तो पुन्हा १९,५०० च्या वर मात्र २० हजाराच्या खाली आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayhem in stock markets bse sensex down 430 pts investors lose rs 1 tn
First published on: 14-05-2013 at 12:40 IST