देशांतर्गत स्मार्टफोन बाजारपेठेत कोरियाच्या सॅमसंगला अस्वस्थ करणारी मुशाफिरी भारतीय बनावटीच्या मायक्रोमॅक्सने केली आहे. स्मार्टफोन क्षेत्रात सर्वाधिक २२ टक्के बाजारहिस्सा काबीज करत सॅमसंगला २० टक्क्यांवर रोखले आहे.
‘कॅनलेज’ने केलेल्या गेल्या तिमाही कालावधीसाठी केलेल्या सर्वेक्षणात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ मध्ये पहिल्या व दुसऱ्या स्थानावर अनुक्रमे मायक्रोमॅक्स व सॅमसंग तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे कार्बन व लावा या कंपन्या राहिल्या आहेत.
भारतीय मोबाइल बाजारपेठ ही वार्षिक ९० टक्क्यांनी वाढून डिसेंबरअखेरच्या तिमाहीत २.१६ कोटी झाली आहे. भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत स्थानिक कंपन्यांची वाढती मक्तेदारी उल्लेखनीय असल्याचे ‘कॅनलेज’चे विश्लेषक ऋषभ दोशी यांनी म्हटले आहे. स्थानिक कंपन्याही आता १० हजार रुपयांच्या आतील स्मार्टफोन सादर करत आहेत, असेही ते म्हणाले.
‘आयडीसी’च्या आकडेवारीनुसार, जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत २४.५ टक्क्यांसह सॅमसंग २०१४ मध्ये आघाडीवर राहिली आहे. मात्र आधीच्या वर्षांतील ३१.३ टक्क्यांवरून तिचा हा क्रम घसरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेची अ‍ॅप्पल कंपनी आहे.
ल्ल  सॅमसंगचाच वरचढतेचा दावा
‘कॅनलेज’च्या आकडेवारीवर अविश्वास व्यक्त करत सॅमसंगने ३४.३ टक्क्ये बाजारहिश्शासह आपणच भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत वरचढ असल्याचा दावा केला आहे. यासाठी कोरियन कंपनीने ‘जीएफके’च्या आकडेवारीचा हवाला दिला आहे. ‘जीएफके’ची आकडेवारी अधिक विश्वासार्ह असून अनेक उद्योगांमार्फत तिचे अनुकरण केले जाते, असेही सॅमसंगने याबाबत म्हटले आहे.