सत्या नाडेलांच्या मार्गदर्शनाखाली मोठा व्यवहार
‘प्रोफेशनल फेसबुक’ अशी ओळख असलेल्या लिंक्डइन हे संकेतस्थळ खरेदी करण्याची उत्सुकता आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने दर्शविली आहे. २६.२ अब्ज डॉलर रकमेत होणारा हा व्यवहार
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांच्या मार्गदर्शनाखालील कंपनीच आजवरचा सर्वात मोठा ठरणार आहे. व्यवहार घोषणेनंतर बाजारात लिंक्डइनचा समभाग ४८ टक्क्य़ांनी उसळला.
लिंक्डइनच्या प्रत्येक समभागाकरिता १९६ डॉलर मोजून सर्व व्यवहार रोखीने करण्याचा मानस मायक्रोसॉफ्टने व्यक्त केला आहे. ही रक्कम कंपनीचा शुक्रवार बंदच्या समभाग मूल्य दरापेक्षा ४९.५ टक्के अधिक आहे. (समभागाने २०१५ मध्ये २७० डॉलर असा सर्वोच्च भाव भांडवली दफ्तरी नोंदविला आहे.) केलिफोर्नियास्थित लिंक्डइनचे जगभरात ४३.३० कोटी वापरकर्ते आहेत.
या खरेदी व्यवहारानंतर लिंक्डइन नाममुद्रा कायम ठेवण्यात येणार असल्याचे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी जेफ विनर हेही कंपनीच्या या पदावर कायम असतील, असेही नाडेला यांनी म्हटले आहे. लिंक्डइनचे भारतात ६५० कर्मचारी असून तिचे बंगळुरुत संशोधन व विकास केंद्र आहे. तर समूहातील तिच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ९,७०० आहे.
लिंक्डइन संस्थापक हॉफमन यांनी २००२ मध्ये आपल्या घरातून सुरू केले व त्याचे औपचारिक सादरीकरण मे २००३ मध्ये करण्यात आले. वार्षिक तुलनेत तिच्या वापरकर्त्यांची संख्या १९ टक्क्य़ांनी वाढते आहे. लिंक्डइनचा २०१६ मधील पहिल्या तिमाहीत महसूल ३५ टक्क्य़ांनी वाढून ८६.१० कोटी डॉलर झाला आहे. कंपनीने २०१५ मध्ये १६.४८ कोटी डॉलरचे नुकसान सोसले होते.
२००४ मधील गुगलनंतर भांडवली बाजारात उतरलेली लिंक्डइन ही पहिली मोठी कंपनी होती. तिने मे २०११ मध्ये ४५ डॉलर प्रति समभाग मूल्याद्वारे बाजारात शिरकाव केला होता.
सत्या नाडेला यांच्या गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीतीलही हा सर्वात मोठा व्यवहार मानला जात आहे. नाडेला यासाठी फेब्रुवारीपासून प्रयत्नशील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायक्रोसॉफ्टची खरेदी
१.४५ अब्ज : नेव्हिझन (२००२)
८.५ अब्ज : स्काईप (२०११)
१.२ अब्ज : यामर (२०१२)
९.४ अब्ज : नोकिया (२०१३)
२.५ अब्ज : मोजंग (२०१४)
(रक्कम डॉलरमध्ये)

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft linkedin deal
First published on: 14-06-2016 at 07:46 IST