पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे बंधनकारक करणाऱ्या निर्णयाचा शेतकरी हिताचा म्हणून जोरदार स्वागत झाले. मात्र इथेनॉलला मिळणारी तुटपुंजी किंमत आणि ते पेट्रोलमध्ये मिसळण्याच्या निर्णयाची तेल कंपन्यांकडून होणाऱ्या यथातथाच अंमलबजावणीमुळे इथेनॉल उत्पादकांत घालमेल सुरू झाली आहे. अलीकडे पेट्रोलच्या दरात झालेल्या घसरणीने तेल कंपन्यांच्या अनास्थेत आणखीच भर पडली होती.
गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीत प्रचंड वेगाने घसरण झाली. त्यामुळे पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर हे अधिक झाल्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे तेल कंपन्यांना परवडत नसल्यामुळे इथेनॉल मिसळण्याचा निर्णय या ना त्या कारणाने थंडबस्त्यात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय दर सध्या कमी झाले असले तरी ते कायमच या स्थितीत राहतील, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय राबवण्यासाठी केंद्र सरकारने सक्तीचे पाऊल उचलले पाहिजे. प्रसंगी सरकारच्या तिजोरीला आíथक झळ पोहोचली तरी दीर्घकालीन राष्ट्रीय हिताचा विचार करून हा निर्णय घेतला गेला पाहिजे, असे मत राज्य साखर संघाचे अध्यक्ष व अखिल भारतीय इथेनॉल उत्पादक संघटनेचे अध्यक्ष खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
 इथेनॉल मिश्रण केल्यामुळे कर्ब वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते, देशासाठी मौल्यवान परकीय चलनही वाचवले जाते. इथेनॉलचा वापर वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात वाढ होते, असे या निर्णयाचे सकारात्मक पलू आहेत. त्याचप्रमाणे पेट्रोल घेणाऱ्या ग्राहकांना काहीसा किमत सवलतीचा लाभ दिला जावा ज्यातून इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण वाढेल, असे मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन-इस्माचे सदस्य व नॅचरल शुगर कारखान्याचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.
इथेनॉलमिश्रित पेट्रोल पंपावरच अन्य इंधनांप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले तर वाहतुकीचे अंतर व खर्च वाचेल. विदेशात ज्याप्रमाणे इथेनॉल मिश्रित पेट्रोल व निव्वळ पेट्रोल असे वेगळे पंप असतात त्याच पद्धतीने ही सुविधा देशांतर्गत उपलब्ध करता येऊ शकते, असाही एक मतप्रवाह आहे.
केंद्र सरकारचा इथेनॉलचा पेट्रोलमधील वापर वाढवण्याचाही विचार आहे. एकूणच सर्वाच्या हिताचा निर्णय असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत बारामती अॅग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन रोहित पवार यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mixing ethanol with petrol mandatory
First published on: 12-12-2014 at 01:43 IST