टाटा समूहाच्या अध्यक्षपदी चंद्रा विराजमान

एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबाबाहेरील व बिगर पारसी असलेले पहिले अध्यक्ष ठरले आहेत.

टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी स्वीकारली. दक्षिण मुंबईतील मुख्यालय ‘बॉम्बे हाऊस’ येथे त्यांचे खास स्वागत समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी केले.

 

पदभार स्वीकारताच कारभाराची त्रिसूत्री जाहीर

टाटा समूहाला अधिक भक्कम करणे, कंपन्यांचा प्रतिसाद वृद्धिंगत करणे आणि भागधारकांना आकर्षित परतावा मिळवून देणे ही आपल्या कारभाराची त्रिसूत्री टाटा समूहाचे नवे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी जाहीर केली. सुमारे १०३ अब्ज डॉलर व तब्बल १५० वर्षे जुन्या टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी स्वीकारली.

नेतृत्व करा, अनुसरण करू नका, असा सल्ला त्यांनी अध्यक्ष या नात्याने लिहिलेल्या पहिल्याच पत्रात कर्मचाऱ्यांना दिला.

टाटा समूहात तब्बल तीन दशकांपासून असलेले व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून समूहातील टीसीएसला आघाडीच्या स्थानावर नेण्यात सिंहाचा वाटा असलेल्या चंद्रशेखरन यांनी मंगळवारी नव्या पदाचा कार्यभार मंगळवारी सकाळी स्वीकारला. यासाठी समूहाचे दक्षिण मुंबईतील मुख्यालय ‘बॉम्बे हाऊस’ येथे त्यांचे खास स्वागत समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी केले.

एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबाबाहेरील व बिगर पारसी असलेले पहिले अध्यक्ष ठरले आहेत. ५३ वर्षीय एन. चंद्रशेखरन हे समूहात १९८७ मध्ये रुजू झाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने एन. चंद्रशेखरन यांनी टीसीएसमध्ये गेल्या जवळपास दहा वर्षांमध्ये दहा पट बाजारमूल्य मिळवून दिले आहे. नव्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर समूहातील कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात एन. चंद्रशेखरन यांनी भविष्यातील आपल्या कारकीर्दीचा आलेख मांडला. समूहाला त्याचे स्थान पुन्हा प्राप्त करून देण्यासह कर्मचारी, भागीदारांचे हित जोपासले जाण्याबाबत त्यांनी शब्द दिला. भागधारकांना आकर्षित मूल्य प्राप्त करून देण्यावर आपला भर असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कंपनी सुशासनावरून सायरस मिस्त्री व रतन टाटा यांच्यात मतभेद झाल्यानंतर मिस्त्री यांची २४ ऑक्टोबर रोजी समूहाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

एन. चंद्रशेखरन यांच्यापुढे आता समूहातील विशेषत: टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस, टाटा स्टीलसारख्या सध्या बिकट आर्थिक वाटचाल करणाऱ्या कंपन्यांमध्ये सुधारणा करण्याचे आव्हान आहे.

एन. चंद्रशेखरन यांनी मंगळवारी त्यांचा पदभार स्वीकारण्याच्या वेळी दिलेल्या नावीन्यतेवरील भरही त्यांची पुढील कार्यदिशा ठरविणारा आहे. एन. चंद्रशेखरन यांची सोमवारी टीसीएसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या समूहाच्या पहिल्याच बैठकीत त्यांच्याकडे टाटा पॉवर, टाटा मोटर्स, टाटा स्टीलच्या अध्यक्षपदाचाही कार्यभार सोपविण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: N chandrasekaran tata sons new chairman