नवी दिल्ली : राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) ने गुरुवारी ई-व्यापार क्षेत्रातील अ‍ॅमेझॉनने दाखल केलेल्या याचिकेवरून भारतीय स्पर्धा आयोग अर्थात ‘सीसीआय’ आणि फ्यूचर कूपन्सला नोटीस बजावली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीसीआयने अ‍ॅमेझॉनच्या दोन वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या फ्युचर कूपन्ससोबतच्या मान्यता दिलेला करार तहकूब करीत असल्याचा आदेश अलीकडेच दिला. या निर्णयाविरोधात अ‍ॅमेझॉनने एनसीएलएटीकडे याचिका दाखल करत ‘सीसीआय’च्या निर्णयाला आव्हान दिले होते. आता एनसीएलएटीच्या एम. वेणुगोपाल आणि व्ही. पी. सिंग यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने स्पर्धा आयोग आणि फ्युचर कूपन्सला पुढील १० दिवसांत याप्रकरणी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तर याचिकाकर्ता अ‍ॅमेझॉनला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे.

काय आहे प्रकरण?

फ्यूचर कूपन्स प्रायव्हेट लिमिटेड या फ्यूचर समूहातील कंपनीतील ४९ टक्के मालकी अ‍ॅमेझॉन या जागतिक ई-व्यापार कंपनीच्या ताब्यात देण्याची दोन वर्षांहून अधिक जुनी मान्यता सीसीआयने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तहकूब करीत असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर विशिष्ट नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन अ‍ॅमेझॉनला २०२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. अ‍ॅमेझॉनने २०१९ सालात फ्यूचर समूहाबरोबर केलेल्या करारामागील ‘वास्तविक हेतू आणि तपशील’ दडवून ठेवले, जे या कराराला मंजुरी मिळविताना पुढे आणणे अत्यावश्यक होत्या. वास्तवाची अशा रीतीने दडपणूक करून खोटे चित्र स्थापित केले गेले, असा सुस्पष्ट ठपका स्पर्धा आयोगाने ५७ पानी आदेशात अ‍ॅमेझॉनवर ठेवला होता. यामुळे त्या कराराची नव्याने तपासणी करणे आवश्यक असून तोवर त्याला पूर्वी दिली गेलेली मान्यता ‘तहकूब’ करीत असल्याचे आयोगाने म्हटले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nclat issues notices to cci future group in amazon case zws
First published on: 14-01-2022 at 03:01 IST