एनटीपीसी भागविक्रीचा दोन तासातच भरणा पूर्ण

सरकारच्या पाच टक्के भांडवली हिस्सा विकू पाहणाऱ्या या प्रक्रियेत अवघ्या दोन तासातच भरणा पूर्ण झाला.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आज विक्री

भांडवली बाजारात मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसीच्या ५०३० कोटी रुपयांच्या भागविक्रीला १.१८ पटीने प्रतिसाद मिळाला. सरकारच्या पाच टक्के भांडवली हिस्सा विकू पाहणाऱ्या या प्रक्रियेत अवघ्या दोन तासातच भरणा पूर्ण झाला.

कंपनीने पात्र गुंतवणूकदार संस्थांकरिता जारी केलेल्या ३२.९८ कोटी समभागांच्या तुलनेत बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारातच ३८.९२ कोटी समभागांकरिता मागणी नोंदविली गेली. प्रति समभाग १२२ रुपये अशी विक्री किंमत होती. भागविक्रीकरिताचा समभागाचा उपलब्ध भाव हा सोमवारी १२६.८५ वर बंद झालेल्या समभागाच्या तुलनेत ३.८२ टक्के सवलतीतील होता.

कंपनी एकूण ४१.२२ कोटी समभाग उपलब्ध करून देत आहे. पैकी किरकोळ गुंतवणूकदारांकरिता २० टक्के हिस्सा राखीव आहे. त्याची विक्री बुधवारी आणखी ५ टक्के किंमत सवलतीने होईल. २ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या समभागांकरिता या गुंतवणूकदारांना मागणी नोंदविता येणार नाही. मंगळवारच्या व्यवहारात समभाग ‘बीएसई’वर  ३.०४ टक्क्य़ांनी घसरला.

फेरविक्री प्रक्रियेबाबत सेबीने केलेल्या नियम बदलानंतर ही प्रक्रिया राबविणारी एनटीपीसी ही पहिली कंपनी आहे. नव्या निर्गुतवणुकीनंतर सरकारचा कंपनीतील हिस्सा सध्याच्या ७४.९६ टक्क्य़ांवरून ६९.९६ टक्क्य़ांवर येणार आहे. सरकारने बरोबर तीन वर्षांपूर्वीही कंपनीबाबत ही प्रक्रिया राबविली होती. त्यावेळी ५ टक्के निर्गुतवणुकीच्या माध्यमातून ८४८०.१० कोटी रुपये जमा झाले होते.

मार्च २०१६ अखेपर्यंतचे सरकारने आधी जाहीर केलेले ६९,५०० कोटी रुपयांचे निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट कमी करत ते ४०,००० कोटी रुपयांवर आणले आहे. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत या माध्यमातून पाच कंपन्यांच्या आधारावर केवळ १३,२७७ कोटी रुपयेच उभारण्यात आले आहेत. वर्ष संपण्यास महिन्याचा कालावधी शिल्लक असताना सरकारचे लक्ष्य यंदाही पूर्ण होणे बिकट आहे. निर्गुतवणुकीबाबत सरकारकडून जाहीर प्रतीक्षा यादीत आणखी १० कंपन्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ntpc offer for sale sees full subscription from institutional investors

ताज्या बातम्या