निष्कासित सायरस मिस्त्री यांचा नवा आरोप ; अहंकारापोटीच कोरस खरेदीच्या निर्णयाचा ठपका ;  समूह नफ्यात सहभागाचा दावा

टाटा सन्समधून हकालपट्टी झालेल्या सायरस मिस्त्री यांनी हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांच्यावरील आरोप हल्ला सुरूच ठेवला असून टाटा यांचा टीसीएस विकण्याचा प्रयत्न सुरू होता, असा गौप्यस्पोट मंगळवारी केला.

टीसीएस तसेच जग्वार अ‍ॅण्ट लॅण्ड रोव्हरमध्ये आपले काहीही योगदान नसल्याचा टाटा यांचा आरोप फेटाळून लावतानाच कोरस खरेदी म्हणजे रतन टाटा यांचा अहंकार होता, असेही मिस्त्री यांनी म्हटले आहे.

टीसीएस ही कंपनी आयबीएमला विकण्याचा प्रस्ताव रतन टाटा यांनी तत्कालीन अध्यक्ष जे. आर. डी. टाटा यांना दिला होता, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे. मात्र याबाबतचा कालावधी पत्रात स्पष्ट करण्यात आलेला नाही.

रतन टाटा त्या वेळी आयबीएमबरोबरच्या भागीदारीतील टाटा इंडस्ट्रीजचे प्रमुख होते, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे. टीसीएसचे तत्कालीन प्रमुख एफ. सी. कोहली हे रुग्णालयात आजारी असताना रतन टाटा यांनी हा प्रस्ताव मांडला होता, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

मिस्त्री यांच्या कार्यालयाने मंगळवारी सायंकाळी सादर केलेल्या पाच पानी पत्रात रतन टाटा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टाटा समूहातील टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस) ही माहिती तंत्रज्ञान कंपनी आयबीएम या अन्य एका कंपनीला विकण्याचा रतन टाटा यांचा प्रयत्न सुरू होता, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर लंडन येथील कोरस ही स्टील उत्पादक कंपनी दुप्पट किमतीने खरेदी करण्याचा टाटा यांचा निर्णय म्हणजे केवळ अहंकारच होता, असेही म्हटले आहे.

टीसीएस तसेच जग्वार अ‍ॅण्ड लॅण्ड रोव्हर या दोन्ही कंपन्यांवर सायरस मिस्त्री हे बिगर कार्यकारी अध्यक्ष होते. आपल्या कारकिर्दीत या दोन्ही कंपन्या समूहाला नफा मिळवून देत होत्या, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

टाटा सन्समार्फत सोमवारी टीसीएसच्या संचालकपदावरून मिस्त्री यांना हटविण्यासाठी आवश्यक विशेष सर्वसाधारण सभेकरिता टीसीएसलाही भागधारकांची बैठक बोलाविण्यास सांगण्यात आले. मिस्त्री हे कंपनीकरिता ‘प्रचंड धोकादायक’ असल्याचे नमूद करत टाटा सन्सने तिची आणखी एक उपकंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडलाही मिस्त्रींना काढण्यासाठी बैठक बोलाविण्यास सांगण्यात आले आहे.

टीसीएसची बैठक १३ डिसेंबर रोजी तर इंडियन हॉटेल्सची बैठक २० डिसेंबर रोजी होणार आहे.

टाटा सन्सच्या अखत्यारीतील टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा स्टील आदी कंपन्यांवरही मिस्त्री हेच अद्याप अध्यक्ष आहेत. टाटा सन्सचा ३१.०५ टक्के हिस्सा असलेल्या टाटा पॉवरच्या संचालक मंडळाची बैठक येत्या २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मिस्त्री, वाडिया यांना हटविण्यासाठी टाटा केमिकल्सची बैठक

  • टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळावरून अध्यक्ष सायरस मिस्त्री व संचालक नसली वाडिया यांना हटविण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची येत्या २३ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.
  • टाटा केमिकल्स ही शेअर बाजारात सूचिबद्ध सार्वजनिक कंपनी असल्याने मिस्त्री व वाडिया यांना दूर करण्यासाठी कंपनीला भागधारकांची मंजुरी आवश्यक ठरणार आहे.
  • सायरस मिस्त्री यांना टाटा सन्समधून काढल्यानंतरही टाटा केमिकल्सच्या अध्यक्षपदी ते कायम आहेत. कंपनीत मुख्य प्रवर्तक म्हणून टाटा सन्सचा १९.३५ टक्के भांडवली हिस्सा आहे. टाटा सन्सने टाटा केमिकल्सला बैठक बोलाविण्याविषयी १० नोव्हेंबर रोजी सांगितले होते.