ह्यूस्टन : तेल निर्यातदार आणि सहयोगी राष्ट्रांची संघटना ‘ओपेक प्लस’ने येत्या ऑक्टोबरपासून खनिज तेलाचा पुरवठा प्रति दिन १००,००० पिंपांनी कमी करण्याला सहमती दर्शवल्यामुळे सोमवारी तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत पिंपामागे अडीच डॉलरपेक्षा जास्त वाढ दिसून आली. चालू वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठय़ात केली जाणारी ही पहिलीच कपात असेल आणि तिच्यायोगे गत दोन वर्षांत घसरण सुरू असलेल्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इच्छित पातळीवर स्थिरावल्या जाव्यात, असे उद्दिष्ट आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी झालेल्या बैठकीत, ‘ओपेक प्लस’ने पुढील महिन्यात पुरवठा प्रतिदिन १००,००० पिंपांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आणि पुरवठा ऑगस्टच्या पातळीवर नेला जाईल, असे संघटनेने प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘ओपेक प्लस’ची पुढील बैठक ५ ऑक्टोबरला होणार आहे. त्या दरम्यान बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवून, केव्हाही ओपेक आणि गैर-ओपेक राष्ट्रांची मंत्रीस्तरीय बैठक बोलावण्याचाही विचार केला जाईल.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक आणि ‘ओपेक प्लस’ गटाचा प्रमुख सदस्य रशियाने मात्र उत्पादन कपातीला समर्थन दिलेले नाही आणि त्यामुळे उत्पादन स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असेही म्हटले जात आहे. मार्चमध्ये अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवरून गेल्या तीन महिन्यांत तेलाच्या किमती निरंतर घसरत आल्या आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ आणि चीनच्या काही भागांमध्ये करोना प्रतिबंधांतून टाळेबंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची भाकिते केली जात असून, तेलाची मागणी कमी करणारा परिणाम त्यातून होऊ शकते या चिंतेचा ‘ओपेक प्लस’ गटावरही दबाव आहे.

तेल तापले! तेल निर्यातदार राष्ट्रांच्या या निर्णयामुळे नोव्हेंबरसाठी करार झालेल्या ब्रेंट क्रूडच्या वायद्यांनी सोमवारच्या सत्रात प्रति पिंप ३.५७ डॉलर (३.८ टक्के) फरकाने उसळी घेत ९६.५९ डॉलर अशी मजल गाठल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opec agrees to cut production after oil price jump zws
First published on: 06-09-2022 at 02:55 IST