जवळपास दोनशे वर्षांचा वारसा असलेल्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सने स्व. दाजीकाका गाडगीळ यांना अनोखी आदरांजली अर्पण करण्याच्या हेतूने येत्या नऊ महिन्यांत नव्या नऊ दालनांच्या स्थापनेची घोषणा केली आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरातमधील एका दालनाचाही समावेश आहे.
चालू वर्षांत दाजीकाकांची पहिली पुण्यतिथी आहे, तसेच हेच वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्षदेखील आहे. यानिमित्ताने या वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ही दालने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली. दुबईतील एक व महाराष्ट्रातील पाच दालनांसह पणजी, हुबळी, इंदूर येथे प्रत्येकी एक दालन याअंतर्गत सुरू करण्यात येणार आहे.
या व्यवसाय विस्तारांतर्गत कंपनीची ११ सप्टेंबर २०१५ पर्यंत विविध चार राज्यांमध्ये २० हून अधिक दालने होतील, असे कंपनीचे कार्यकारी संचालक पराग गाडगीळ यांनी सांगितले. या विस्ताराचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेत्री व कंपनीची राजदूत माधुरी दीक्षित हिच्या हस्ते ३० जानेवारीला उद्घाटन होणाऱ्या पनवेल दालनाद्वारे होणार आहे.