कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेले ‘युनायटेड स्पिरिट’चे समभाग विकून ‘किंगफिश र एअरलाईन्स’ला दिलेले कर्ज वसुल करण्याचा धनको बँकांचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाने मोकळा मंगळवारी मोकळा केल्याने ‘किंगफिशर एअरलाईन्स’चे विजय मल्ल्या यांना मोठा दणका बसला आहे. असे करण्यापासून बँकांना रोखावे यासाठी मल्ल्या यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
गेल्या ऑक्टोबरपासून जमिनीवर आलेल्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी घेतलेल्या ७,००० कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात विविध १७ बँकांकडे तारण ठेवलेले युनायटेड स्पिरिटचे ६,५०० हून अधिक किंमतीचे समभाग आहेत. वसुलीसाठी बँका ते खुल्या बाजारात विकतील या भीतीपोटी ही प्रक्रिया रोखण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे मुख्य प्रवर्तक विजय मल्ल्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना न्या.एस. जे. कथावाला यांनी अशाप्रकारे बँकांना समभाग विक्रीसाठी रोखण्यास असमर्थता दर्शविली.
किंगफिशरसाठी कर्ज उचलताना युनायटेड ब्रेव्हरेज (युबी) समूहाने बँकांबरोबर २०१० मध्ये केलेल्या करारान्वये अंतिम पर्याय म्हणून समभाग विक्री करण्याचा बँकांचा मार्ग खुला आहे. समभाग विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाल्याचेही न्यायालयात बँकांच्या वतीने सांगण्यात आले. तर युबी समूहाच्या वतीने वकिल बिरेंद्र सराफ यांनी बँकांनी आम्हाला समूहाची उपकंपनी मँगलोर केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सचे तारण ठेवलेले १ कोटी समभाग यापूर्वीच विकले असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वीही कर्जाच्या बदल्यात युनायटेड स्पिरिट आणि किंगफिशर एअरलाईन्सचे २३ लाख समभाग बँकांकडे तारण असल्याची माहिती न्यायालयालयाला युबी समूहाने दिली आहे.
मुंबईच्या शेअर बाजारात मंगळवारी १,८५९.८० रुपयांना (सोमवारच्या तुलनेत १.५% मूल्य घसरण) व्यवहार करणाऱ्या युनायटेड स्पिरिटचे ३.५ कोटी समभाग स्टेट बँकेसह विविध १७ बँकांकडे तारण आहेत. किंगफिशरला दिलेल्या एकूण कर्जापैकी ही समभाग रक्कम ९० टक्क्यांहून अधिक आहे. शिवाय किंगफिशर हा ४,००० कोटी रुपयांचा ब्रॅण्ड आणि मल्ला यांचे निवासस्थान, कार्यालयही बँकांकडे तारण आहेत.
” ७,००० कोटी
किंगफिशर एअरलाईन्सचे विविध बँकांकडील एकूण थकीत कर्ज
” ६,५१० कोटी
यूबी समूहातील विविध कंपन्यांचे बँकांकडे तारण म्हणून असलेल्या समभागांचे विद्यमान बाजारमूल्य
* युनायटेड स्पिरिट्स रु. १८५९.८० -१.५०%
* युनायटेड ब्रुअरीज रु. ७१८.९० +०.८२%
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2013 रोजी प्रकाशित
तारण समभाग विक्रीस बँकांना मुभा;
कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेले ‘युनायटेड स्पिरिट’चे समभाग विकून ‘किंगफिश र एअरलाईन्स’ला दिलेले कर्ज वसुल करण्याचा धनको बँकांचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाने मोकळा मंगळवारी मोकळा केल्याने ‘किंगफिशर एअरलाईन्स’चे विजय मल्ल्या यांना मोठा दणका बसला आहे.

First published on: 03-04-2013 at 02:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission to banks for sale the pledge shares court blash on vijay mallya