रिझव्र्ह बँकेने किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचे जानेवारी २०१७ साठी निर्धारित केलेले ५ टक्क्यांचे लक्ष्य गाठले जाण्याबाबत आशावाद कायम ठेवला आहे. नजीकच्या भविष्यात मात्र त्या संबंधाने साशंकता निर्माण झाली असल्याची चिंताही मंगळवारच्या पतधोरणाने व्यक्त केली. विशेषत: मार्चच्या तुलनेत सरलेल्या एप्रिलमध्ये तब्बल १ टक्का अधिक ५.३९ टक्के अशी महागाई दरातील तीव्र वाढ अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. विशेषत: घरभाडे, शिक्षण शुल्क, टॅक्सी-ऑटो रिक्शा यांचे भाडे, पाणीपट्टी अशा सेवांच्या दरवाढीसह, अन्नधान्यांच्या किमतीतील वाढीचे स्वरूप तीव्र स्वरूपाचे दिसून आले आहे. प्रति पिंप ५० डॉलरच्या घरात गेलेल्या खनिज तेलाच्या किमती तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीतून महागाई दरात वाढीच्या शक्यतांची रिझव्र्ह बँकेने दखल घेतली आहे. तथापि अपेक्षेप्रमाणे पाऊस चांगला झाल्यास आणि सरकारने अन्नधान्य वितरणाचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास महागाई दरातील वाढीला बांध घातला जाऊ शकेल, असा विश्वासही व्यक्त केला. अर्थात प्रतिकूल परिणामांना गृहीत धरूनही आगामी आर्थिक वर्षांत महागाई दर ५ टक्क्यांच्या आसपास राहणे रिझव्र्ह बँकेने अपेक्षिले आहे.