सोने आयातीने गाठलेली उच्चतम पातळी भारतासारख्या देशाला परवडणारी नसून, याबाबतच्या धोरणाचा लवकरात लवकर फेरआढावा घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी येथे बोलताना स्पष्ट केले. कच्च्या तेलापाठोपाठ भारतात सर्वाधिक आयात होणारी वस्तू ही सोने असून सरकारच्या प्रतिबंधात्मक प्रयत्नांनंतरही सरलेल्या एप्रिल महिन्यात सोने आयातीत १३८ टक्क्यांची भयंकर वाढ झाली आहे.
वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी, सोन्याच्या आयात-निर्यात धोरणाबाबत फेरआढाव्याबाबत आपणास सूचित करण्यात आले असल्याचे केंद्रीय अर्थ-सचिव अरविंद मायाराम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्या नेतृत्वाखालील ‘वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदे’च्या बैठक आटोपून बाहेर पडताना त्यांनी हे विधान केले. गेल्या आठवडय़ात गव्हर्नर सुब्बराव यांनी सोन्याच्या नाणी विकण्यावर वाणिज्य बँकांवर कोणतेच र्निबध आणले नसल्याचे स्पष्ट केले असले तरी हा पर्याय पुढे जाऊन आजमावण्यात येईल, असे मायाराम यांनी आज सूतोवाच केले.
देशाच्या विदेशी चलन गंगाजळीला कात्री लावतानाच, आयात-निर्यात व्यापार संतुलनही बिघडविणाऱ्या सोने आयातीला रोखण्यासाठी जानेवारी २०१३ मध्ये सोन्यावरील आयात शुल्कात सरकारने ६ टक्क्यांपर्यंत वाढ केली, तर गेल्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेनेही बँकांकडून होणाऱ्या सोने आयातीवर काही र्निबध घातले आहेत. तरी २०१२-१३ या आर्थिक वर्षांत देशात ८३० टनाची सोने आयात झाली आणि एप्रिल-मे महिन्यात तर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती कमालीच्या ओसरल्याने आयातीत विक्रमी भर पडली आहे.

सुगीबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशात खुळखुळणारा पैसा हा सोन्यामध्येच परावर्तित होतो असा देशाच्या ग्रामीण भागाचा अनुभव राहिला आहे. म्हणून यंदा अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाल्यास सोन्याची मागणी वाढणारच!
– पी आर सोमसुंदरम
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल