मुंबई : रशियाच्या आक्रमणानंतर गुरुवारच्या सत्रात जगभरातील भांडवली बाजारांवर प्रतिकूल परिणाम दिसून आले. मात्र युक्रेनवरील हल्ल्यावरील प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेसह युरोपातील देशांनी रशियावर लादलेले र्निबध हे जसे अनुमान होते तितके कठोर नाहीत. ज्याचा परिणाम म्हणून जगभरातील भांडवली बाजारांमध्ये आलेल्या तेजीचे सकारात्मक पडसाद शुक्रवारी देशांतर्गत भांडवली बाजारातही उमटले.

अमेरिकेसह आशियातील भांडवली बाजार सावरल्यानंतर देशांतर्गत भांडवली बाजारात शुक्रवारच्या तेजीने सलग सात सत्रातील घसरणीला चाप बसला. शिवाय गुरुवारच्या पडझडीत निर्देशांकांनी सोसलेल्या मोठय़ा तुटीची जवळपास निम्म्याने भरपाई केली गेली.  

सप्ताहाअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३२८.६१ अंशांनी म्हणजेच २.४४ टक्क्यांनी वधारून ५५,८५८.५२ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ४१०.४५ अंशांची म्हणेजच २.५३ टक्क्यांची उसळी घेतली आणि तो दिवसअखेर १६,६५८.४० पातळीवर स्थिरावला.

गुरुवारच्या पडझडीत सेन्सेक्स २,७०२ अंशांनी कोसळत ५४,५२९.९१ पर्यंत खाली आला होता. गेल्या दोन वर्षांतील एका सत्रातील सर्वात मोठी (पावणेपाच टक्क्यांची) घसरण नोंदवण्यात आली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात देखील अनुक्रमे १,३०१ आणि १,५५५ अंशांची घसरण झाली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली ६,४४८.२४ कोटी रुपये मूल्यांच्या समभागांची विक्री हे मोठय़ा पडझडीमागील प्रमुख कारण होते. एका दिवसात गुंतवणूकदारांना सुमारे १३ लाख कोटींचा फटका बसला होता. मात्र शुक्रवारच्या सत्रात बाजार सावरल्याने गुतंवणूकदारांचे काही अंशी नुकसान भरून निघू शकले आहे.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि टेक मिहद्र यांचे समभाग प्रत्येकी ६.५४ टक्क्यांपर्यंत वधारले. दुसरीकडे हिंदूुस्थान युनिलिव्हर,  नेस्लेच्या समभागात घसरण झाली.

बाजार सावरण्याची कारणे काय?

’  विश्लेषकांच्या मते, अमेरिका युरोप आणि इतर अनेक देशांनी रशियावर लादलेले र्निबध हे बाजाराने धडकी घ्यावी इतके कठोर नाहीत.

’ या र्निबधांमुळे स्विफ्ट या जागतिक पेमेंट प्रणालीतून रशियाच्या अर्थव्यवस्थेचे निष्कासन झाले नसल्याने रशियातून होणाऱ्या नैसर्गिक वायू, तेल निर्यातीला बाधा येणार नसल्याने विशेषत: युरोपातील बाजारपेठांनी मोकळा श्वास घेतला.

’  युरोपिय महासंघातील राष्ट्रांची चाळीस टक्के इंधन गरज ही रशियाच्या निर्यातीतून भागविली जाते आणि त्याचा मोबदला हा स्विफ्ट प्रणालीतून चुकता केला जातो. 

’  भारताला होणारा खनिज तेलाचा पुरवठा हा प्रामुख्याने आखाती देशातून होत असल्याने, भारताच्या पुरवठय़ावर या युद्धाचा नगण्य परिणाम दिसून येईल.

’  ज्या वाईट घडामोडीचे भाकीत केले गेले होते ते प्रत्यक्षात घडून गेल्याने सलग सात दिवसांच्या पडझडीने खालच्या किमतीत उपलब्ध उमद्या समभागांच्या मूल्यात्मक खरेदीची संधी गुंतवणूकदारांनी साधली.

जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात तेजी परतली. गुरुवारच्या सत्रात मोठय़ा प्रमाणावर समभागांची विक्री झाल्याने गुंतवणूकदारांनी कमी झालेल्या मूल्यांकनाचा फायदा घेत समभाग खरेदीला प्राधान्य दिले. याचबरोबर अमेरिकेने रशियावर लादलेल्या र्निबधांमुळे रशियातून होणाऱ्या तेल निर्यातीला किंवा स्विफ्ट यआ जागतिक पेमेंट नेटवर्कला लक्ष्य केले नसल्याने जागतिक बाजारपेठांनी मोकळा श्वास घेतला. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार अस्थिर राहतील. 

– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस