गेल्या शुक्रवारी या सदरात ऑइल इंडिया लिमिटेडमधील आपले शेअर्स भारत सरकारने जनतेला ‘ऑफर फॉर सेल (ओएफएस)’ या प्रक्रियेने विकले त्याबाबत लिहिले होते. अनेक वाचकांनी असे कळविले की आम्हाला ते शेअर्स घेण्याची इच्छा होती पण असे काही होणार आहे हेच आम्हाला कळले नाही. काही अंशी हे खरे आहे. कारण जेव्हा आयपीओ प्रक्रियेद्वारे शेअर्स वितरीत केले जातात तेव्हा बरेच दिवस आधी जाहिराती प्रसारीत होत असतात. डार  ‘ओएफएस’च्या बाबतीत वृत्तपत्रात बातमी येत असते तसेच आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक वेबसाइट्स असतात त्यावर याबाबत घोषणा वाचायला मिळू शकतात. बीएसई, एनएसई या स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवरदेखील ही माहिती दिलेली असते. मात्र रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे ‘दिसामाजी काही वाचीत जावे’ ही सवय लावून घेणे आवश्यक आहे. ऑइल इंडियाच्या ‘ओएफएस’साठी दोन्ही स्टॉक एक्स्चेंजनी काही विशेष खिडक्या उघडल्या होत्या त्याबाबत काही माहिती सांगा असाही अनेक वाचकांचा आग्रह आहे. खरे तर या खिडक्या म्हणजे त्यांच्या कार्यालयातले काऊंटर्स नसून एक ‘प्रक्रिया’ असा त्याचा अर्थ आहे. सर्वसाधारणपणे जशी शेअर्सची खरेदी विक्री होते तसेच याबाबतीत झाले. पण रोज हे होणारे सर्व व्यवहार ‘रोिलग मार्केट’ या सदराखाली दाखविले जातात. किंबहुना शेअर्स विकल्यानंतर आपण जी डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप भरून डीपीकडे देतो त्यात सेटलमेंट टाइप म्हणून ‘रोलिंग मार्केट’ असे लिहावे लागते. मात्र  डार  साठी बीएसईने ऑफर फॉर सेल असा मार्केट टाइप निर्माण केला आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे रोज जे व्यवहार होतात त्याबाहेर ऑफर फॉर सेलचे व्यवहार वेगळे दाखविले जातात. हीच ती खिडकी! ट्रेड टू ट्रेड या नावाचीदेखील एक वेगळी ‘खिडकी’ आहे हे जाता जाता सांगतो. ‘ऑक्शन’ या नावाचीही एक खिडकी आहे म्हणजेच सेटलमेंट टाइप!  जेव्हा आपण ब्रोकरला ऑइल इंडियाचे शेअर्स खरेदी करायला सांगतो त्यावेळी त्याला हे सांगण्याची आवश्यकता होती की ते शेअर्स सर्वसाधारण गटात म्हणजे रोलिंग मार्केटमध्ये खरेदी करायचे की ‘ऑफर फॉर सेल’ या खिडकीद्वारे खरेदी करायचे.
डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिपबाबत विषय निघालाच आहे तर त्या अनुषंगाने एक बाब खास लिहावीशी वाटते ती अशी की, आता बीएसई आणि एनएसई बरोबरच एमसीएक्स-एसएक्स या नवीन स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार सुरू झाले आहेत.  बीएसईचा सेटलमेंट क्रमांक उदाहरणार्थ १२१३१२८ असा लिहिला जातो तर एनएसईचा २०१३१२८ असा असतो कारण बीएसई आर्थिक वर्ष तर एनएसई कॅलेंडर वर्ष पाळते. त्यामुळे एखाद्या वेळी गुंतवणूकदाराने डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिपवर स्टॉक एक्स्चेंजचे नाव लिहिले नसले तरी डीपीला ते समजते व  स्लिप पुढील कार्यवाहीसाठी ती ग्राह्य धरीत असे. मात्र आता एमसीएक्सदेखील एनएसई प्रमाणेच कॅलेंडर वर्ष पाळीत असल्याने १ एप्रिल २०१४ पासून त्यांचा सेटलमेंट क्रमांक एकाच दिवशी सारखाच असणार आहे. त्यामुळे स्लिपवर स्टॉक एक्स्चेंजचे नाव न विसरता लिहिणे आवश्यक आहे.
राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीमबाबत माहिती देणाऱ्या कार्यक्रमाबाबत अनेक वाचकांनी विचारणा केली आहे. या योजनेची माहिती देणारा पुढील कार्यक्रम बँक ऑफ इंडियाच्या बांद्रा कुर्ला सकुंलातील मुख्यालयामध्ये २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
एक भागधारक म्हणून माझे काय हक्क आहेत अशी विचारणा केली आहे स्मिता आपटे आणि सचिन कळसुलकर यांनी. आयपीओ प्रक्रियेद्वारे देऊ केलेले शेअर्स विवक्षित वेळेत डिमॅट खात्यात जमा होणे आवश्यक आहे. कंपनीकडून वार्षकि अहवालाची प्रत मिळणे हा तुमचा हक्क आहे. नियोजित दिवसांच्या आत घोषित केलेल्या डिव्हिडंडची रक्कम बँक खात्यात जमा होणे हाही तुमचा हक्क आहे. टेक ओव्हर, डिलिस्टिंग, बायबॅक वगरे बाबतच्या सूचना /माहिती तुम्हाला कंपनीने कळविली पाहिजे. याबाबत कंपनीकडून हयगय होत असल्यास त्याच्या तक्रारी स्टॉक एक्स्चेंजकडे किंवा सेबीकडे एक भागधारक म्हणून दाखल करण्याचा तुम्हाला हक्क प्राप्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Read everyday about stock exchange
First published on: 15-02-2013 at 01:25 IST