स्थावर मालमत्तांच्या विक्रीत २०-३० टक्क्य़ांची घसरण!

नोटाबंदीपायी मागणीला फटका बसण्याचा ‘फिच’चा कयास

REVENUE Secretary Hasmukh Adhia , demonetised currency , RBI , banks, demonistation , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नोटाबंदीपायी मागणीला फटका बसण्याचा फिचचा कयास

केंद्र सरकारने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या निश्चलनीकरणाचे देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रावर दूरगामी परिणाम संभवतात. २०१७ सालात मालमत्तांच्या विक्रीला तब्बल २० ते ३० टक्क्य़ांनी फटका बसेल. परिणामी घरांच्या किमतीही ओसरण्याचे कयास आहेत.

नोटाबंदीनंतर घरांच्या खरेदी-विक्रीच्या रोखीतून होणाऱ्या व्यवहारांना पायबंद बसला आहे, तसेच सावध पवित्रा घेत खरेदीचा निर्णयही लांबणीवर टाकण्याची ग्राहकांमध्ये प्रवृत्ती दिसली आहे. त्यामुळे एकंदर मागणीत २०-३० टक्क्य़ांची घट संभवते, असा ‘फिच रेटिंग्ज’ या विश्लेषण संस्थेचा कयास आहे. या परिस्थितीत स्थावर मालमत्ता विकासकांना किमतीत कपात करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचेही फिचचे म्हणणे आहे.

नोटाबंदीपश्चात नवीन गृहनिर्माण जवळपास थंडावले आहे. विकासकांना मजुरांचे वेतन, ते कंत्राटदार आणि पुरवठादारांना पैशांचा भरणा करण्याच्या व्यावहारिक अडचणींचा चलनकल्लोळामुळे सामना करावा लागला.

नवीन प्रकल्प थंडावले असले तरी पुरवठय़ाच्या स्थितीत अनेक भागांत फरक पडलेला नाही. गृहनिर्माण क्षेत्रात विक्री न झालेल्या घरांचा आधीच प्रचंड मोठा साठा आहे. मागणीला चालना मिळेल अशा काही किंमत सवलतीच्या योजना आणणे त्यामुळे विकासकांना क्रमप्राप्त ठरेल, असा फिचचा निष्कर्ष आहे. शिवाय नजीकच्या काळात रोकडचणचण संपुष्टात येण्याची चिन्हे नसल्याने फार काळ वाट न पाहता, विकसकांकडून किमती पडायला सुरुवात झाल्याचे लवकरच दिसून येईल, असा तिचा कयास आहे.

नोटाबंदी जाहीर झाली त्या २०१६ सालच्या चौथ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत वार्षिक तुलनेत ४४ टक्क्य़ांनी घट झाल्याचे, गत महिन्यांत ‘नाइट फ्रँक रिसर्च’च्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण २०१६ सालात घरांच्या विक्रीतील एकंदर वाढ ही अवघी ९ टक्के नोंदविली गेली. त्या उलट नवीन गृहप्रकल्पांच्या प्रस्तुतीचे प्रमाण जवळपास ६१ टक्क्यांनी घटले, असेही या पाहणी अहवालातून दिसून आले.

चालू वर्षांच्या पूर्वार्धात स्थावर मालमत्ता क्षेत्रात मंदीची भीती फिचकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तरार्धात सणासुदीच्या काळात मागणीत उभारीची शक्यता आहे. पण ही मागणीही घरांसाठी कर्जाच्या व्याजाच्या दरात आणखी किमान अर्धा टक्क्य़ांची कपात घडल्यास आणि अपेक्षेप्रमाणे किमतीत उतार दिसून आल्यास शक्य आहे, अशी पुस्तीही फिचने आपल्या निरीक्षणात नोंदविली आहे.

मुंबईत घरांच्या किमती उतरतील!

घरांच्या किमतीत सर्वाधिक घट ही दिल्लीनजीक राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) मध्ये संभवतात. त्या खालोखाल न विकल्या गेलेल्या घरांचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या मुंबईतही घरांच्या किमती पडतील, असा कयास आहे. या दोन्ही ठिकाणी बांधून तयार परंतु न विकल्या गेलेल्या घरांचे प्रमाण मोठे आहे. शिवाय एनसीआर हे सर्वाधिक रोखीतून व्यवहार देशातील सर्वात मोठे केंद्र असल्याने निश्चलनीकरणाने या व्यवहारांच्या मुळावरच घाव घातला आहे. याउलट स्थिती पुणे आणि चेन्नईसारख्या शहरातअसल्याने तेथे किमतीत लक्षणीय फेरबदलाची शक्यता दिसत नसल्याचे ‘फिच’ने स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Real estate sales decrease

ताज्या बातम्या