वर्षभरात १.१८ लाख कोटींची निधी उभारणी

मुंबई : तेजीवर स्वार झालेल्या भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, जानेवारी २०२१ पासून  ६३ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १,१८,७०४ कोटींचा विक्रमी निधी उभारला आहे.

चालू वर्षात ‘आयपीओ’च्या माध्यमातून कंपन्यांनी २०२० च्या तुलनेत ४.५ पट अधिक निधी उभारला. त्या वर्षात १५ कंपन्यांनी २६,६१३ कोटींचा निधी उभारला होता. तर भांडवल उभारणीसाठी सर्वात चांगले वर्ष ठरलेल्या २०१७ मध्ये ६८,८२७ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला होता, अशी माहिती प्राइम डेटाबेसने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने पुढे आणली आहे.

भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आगेकूच कायम ठेवत चालू वर्षात  ऑक्टोबरमध्ये ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. या अनुकूल वातावरणाचा फायदा घेत मुख्यत: तंत्रज्ञानावर आधारित नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांनी भागविक्रीत आघाडी मिळविल्याचे दिसून आले. या नवउद्यमी कंपन्या तोट्यात असूनदेखील मोठा निधी उभारण्यास यशस्वी होण्याबरोबरच पदार्पणात त्यांच्या समभागांनी मोठे अधिमूल्यही मिळविले आहे, असे प्राइम डाटाबेस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हल्दिया यांनी सांगितले.

एकूणच सार्वजनिक विक्रीच्या माध्यमातून २०२१ मध्ये उभारण्यात आणलेल्या निधीने आतापर्यंत २,०२,००९ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हे १,७६,९१४ कोटी रुपयांच्या २०२० मधील आधीच्या उच्चांकापेक्षा जास्त आहे. डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’कडून प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विक्रमी १८,३०० कोटी रुपये, तर त्यापाठोपाठ घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोने ९,३०० कोटी रुपयांचा निधी उभारला. या वर्षाच्या आयपीओचे सरासरी आकारमान १,८८४ कोटी रुपये राहिले, अशी माहिती हल्दिया यांनी दिली.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकूण भांडवली उभारणी करण्यात आलेल्या २,०२,००९ कोटींपैकी ५१ टक्के म्हणजेच १,०३,६२१ कोटी रुपयांची नवीन भांडवल उभारणी झाली आहे. उर्वरित ९८,३८८ कोटी रुपयांचा निधी प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडील समभागांच्या हिस्सा विक्रीतून (ऑफर फॉर सेल) उभारण्यात आला आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांकडून (रिटेल) मिळालेला मोठा प्रतिसाद हा या वर्षातील आयपीओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ५९ कंपन्यांपैकी ३० कंपन्यांच्या आयपीओला १० पट, ६ कंपन्यांच्या आयपीओला १०० पट अधिक भरणा झाला. तर २३ कंपन्यांना १ ते ३ पट प्रतिसाद प्राप्त मिळाला. आयपीओला बोली लावणारे किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रति आयपीओ सरासरी १४.३६ लाख अर्ज करण्यात आले. ज्याचे प्रमाण २०२० मध्ये १२.७७ लाख आणि २०१९ मध्ये अवघे ४.०५ लाख होते. ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसच्या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक म्हणजे ३३.९५ लाख अर्ज करण्यात आले. त्यापाठोपाठ देवयानी इंटरनॅशनलसाठी ३२.६७ लाख आणि लेटेंट व्ह्यूसाठी ३१.८७ लाख अर्ज आले.

२०२२ मध्ये नवीन विक्रमाची नोंद अपेक्षित

चालू वर्षात ११५ कंपन्यांनी आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे आयपीओसाठी प्रस्ताव दाखल केले होते. २०२२ कॅलेंडर वर्षासाठी  ५०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ३५ कंपन्यांना ‘सेबी’ने हिरवा कंदील दिला आहे. तर भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी वगळता ३३ कंपन्या प्राथमिक बाजारातून ६०,००० कोटींचे निधी उभारणीचे प्रस्तावर सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘एलआयसी’च्या आयपीओची यात भर पडल्यास २०२२ हे नवीन विक्रम नोंदविणारे ठरेल.

पदार्पणातच १० टक्के परतावा

भांडवली बाजारात नव्याने सूचिबद्ध झालेल्या ५८ कंपन्यांपैकी ३४ कंपन्यांनी पदार्पणाच्या दिवशीच १० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला. त्यापैकी सिगाची इंडस्ट्रीजने सर्वाधिक २७० टक्के, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजने १८५ टक्के आणि लॅटन्ट व्ह्यूने १८५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला. सध्या २२ डिसेंबरपर्यंत ५८ पैकी ४० कंपन्यांचे समभाग प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना दिलेल्या किमतीपेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत आहेत.