सरकारच्या आर्थिक मदतीचा हातभार लाभत असलेल्या एअर इंडिया या सार्वजनिक हवाई कंपनीने एकाच दिवसात सर्वाधिक ५० हजारांहून अधिकांना प्रवास घडवून आणण्याची विक्रमी किमया साधली आहे. कंपनीच्या विमानांमधून गेल्या शुक्रवारी एकाच दिवशी ५०,७६५ प्रवाशांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास केला. कंपनीच्या दिवसाला होणाऱ्या ३१९ उड्डाणांद्वारे ही अनोखी संख्या साधली गेली आहे.
मंगळवारी आलेल्या ख्रिसमसला शनिवार आणि रविवारची जोड मिळाल्याने सोमवारसह सलग चार दिवसांची सुटी घेऊन अनेकांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बेत आखले आहेत. त्यासाठी गेल्या शुक्रवारीच अनेकांनी प्रयाण केले. यामुळे एअर इंडियाकडे या एकाच दिवसात ५०,७६५ प्रवाशांची आसने नोंदणीकृत झाली. यामध्ये ३५,२४६ आंतरराष्ट्रीय तर १५,५१९ राज्यांतर्गत प्रवास नोंदला गेला आहे.
एअर इंडियाने गेल्या आठवडाअखेरच्या दिवशी स्थानिक उड्डाणांतर्गत ८७.७ टक्के तर ७७.९ टक्के आंतरराष्ट्रीय उड्डाणांद्वारे आसनक्षमता सिद्ध केली. यामुळे कंपनीने या एकाच दिवशी भारतातील प्रवासादरम्यान ४८ कोटी तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २५ कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळविले. यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रवासात कंपनीची आसनक्षमता ८१ टक्के राहिली आहे.
ऐन उन्हाळ्यातील मोसमात एअर इंडियाला वैमानिकांच्या आंदोलनाचा सामना करावा लागला होता. यामुळे सलग दोन महिने कंपनीची हवाई सेवा विस्कळीत झाली होती. असे असूनही कंपनीने भारतीय हवाई क्षेत्रातील बाजारहिस्सा एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ४.५ टक्क्यांनी अधिक (एकूण २४ टक्के) राखला. यामुळे कंपनी याबाबत दुसऱ्या स्थानावर पोहोचली. २७.२ टक्क्यांसह खाजगी क्षेत्रातील इंडिगो सध्या पहिल्या क्रमांकावर तर २०.७ टक्क्यांसह इंडिगो तिसऱ्या स्थानावर आहे.