रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाचा सामाजिक दायित्वातून उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पात टाकाऊ प्लास्टिक कचऱ्यापासून ४० किलोमीटरचा रस्ता अंतर्गत वाहतुकीसाठी तयार करण्यात आला आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यासाठी ५० टन टाकाऊ प्लॉस्टिक कचरा वापरण्यात आला.

प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन ही एक वैश्विक समस्या झाली आहे. ही बाब लक्षात घेऊ न रिलायन्स इंडस्ट्रीजने नागोठणे येथील प्रकल्पात टाकाऊ  प्लास्टिक कचऱ्यापासून ४० किलोमीटर रस्त्याची निर्मिती केली आहे. ५० टन प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे.

रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पासाठी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यासाठी पेण शहरातील टाकाऊ  प्लास्टिक संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. यातून तयार झालेले ‘शेडेड प्लास्टिक’ रस्ता तयार करण्यासाठी वापरले. यातून मजबूत असा रस्ता तयार करण्यात आला. अतिमुसळधार पावसानंतरही हे रस्ते खराब न होणारे आहेत. शिवाय टाकाऊ  प्लास्टिक कचऱ्याची समस्या यामुळे निकाली निघाल्याचे रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचे महाप्रबंधक विपुल शहा यांनी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्र सरकारने रस्ता निर्मितीसाठी ८ टक्के ते १० टक्के टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र आजवर कोणी या दृष्टीने फारसे प्रयत्न केले नसल्याने सामाजिक दायित्व म्हणून कंपनीने यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले गेले. कंपनीचा रस्ते बांधणी क्षेत्रात उतरण्याचा कोणताही मानस नाही. मात्र चांगल्या रस्त्यांसाठी टाकाऊ  प्लास्टिक प्रक्रिया करून उपलब्ध करून देणे आणि रस्त्यांची बांधणी करणाऱ्यांना ते वापरासाठी तांत्रिक पाठबळ उपलब्ध करून देणे यासाठी कंपनी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी रिलायन्स नागोठणे प्रकल्पाचे प्रमुख अविनाश श्रीखंडे यांनी कंपनीच्या शाश्वत पुनर्वापर उपक्रमांची माहिती दिली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशात १४ लाख मेट्रिक टन प्लास्टिकची मागणी आहे. यातील जवळपास ९ लाख मेट्रिक टन प्लास्टिक कचऱ्याच्या रूपाने जमा होते. त्यामुळे या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कंपनीने टाकाऊ  प्लास्टिकचा वापर करून रस्त्यांच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू केले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून दरवर्षी १०,००० किलोमीटरच्या चार मार्गिका असलेले रस्ते तयार केले जातात. या रस्त्यांसाठी टाकाऊ  प्लास्टिकचा वापर केला तर ४०,००० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होणार असल्याचे कंपनीच्या पॉलिमर विभागाचे प्रमुख अजय शहा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance nagthane project social activities akp
First published on: 29-01-2020 at 01:06 IST