पीएनबी घोटाळ्याप्रकरणी दक्षता आयुक्तांचा ठपका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील सर्वात मोठय़ा बँक घोटाळ्याप्रकरणी रिझव्‍‌र्ह बँकेने पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) योग्य लेखा परीक्षण केले नसल्याचा ठपका केंद्रीय दक्षता आयुक्ताने ठेवला आहे.

पीएनबीमध्ये जेव्हा थकीत कर्ज फसवणूक प्रकरण घडले त्या दरम्यान रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेचे योग्य रीतीने लेखा परीक्षण केले नसल्याचे मुख्य दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी म्हटले आहे. अधिक कठोरपणे लेखा परीक्षण होण्याची आवश्यकता चौधरी यांनी वृत्तसंस्थेकडे मांडली.

देशातील बँक क्षेत्रातील घडामोडींसाठी बँक नियामक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेची जबाबदारी असते, असे नमूद करीत चौधरी यांनी रिझव्‍‌र्ह बँकेने कर्तव्यात कसूर केली तर त्यावर केंद्रीय दक्षता आयुक्तामार्फत बोट ठेवले जाऊ शकते, असेही स्पष्ट केले.

यापूर्वी निश्चित कालावधीत लेखा परीक्षण करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने ठरावीक, अगदी जोखमेच्या वेळीच लेखा परीक्षण करण्याची पद्धती यापूर्वीच अंगीकारली असल्याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले. जोखीम असेल तेव्हा काही मुद्दय़ांच्या आधारे रिझव्‍‌र्ह बँकेने असे लेखा परीक्षण करणे आवश्यक असून संबंधित प्रकरणात असे कोणतेही लेखा परीक्षण झाले नाही, असेही ते म्हणाले.

हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहूल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेला १३,००० कोटी रुपयांच्या कर्जात फसविल्याची तक्रार बँकेने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे केली आहे. बनावट हमीपत्रे वापरून मोदीने त्याच्या कंपन्यांसाठी विदेशातील अन्य बँकांमार्फत कर्ज उचललेप्रकरणी बँकेचे काही वरिष्ठ अधिकारीही सध्या अटकेत आहेत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही रिझव्‍‌र्ह बँकेवर ताशेरे ओढले होते. कर्ज घोटाळा हेरण्यात रिझव्‍‌र्ह बँकेला अपयश आल्याचे अर्थमंत्री म्हणाले होते.

घोटाळा चौकशीची माहिती देण्याचे आदेश

नीरव मोदी फसवणूक प्रकरणातील तपासाबाबतची माहिती सनदी लेखापाल संघटनेला देण्याचे आदेश सरकारने पीएनबीला दिले आहेत. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) ही लेखापाल व्यावसायिकांची देशव्यापी संघटना आहे. तिच्या उच्चस्तरीय गटाची स्थापना पीएनबीचा घोटाळा तपासाकरिता करण्यात आली आहे. हा गट गैरव्यवहार रोखण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reserve bank audit pnb scam
First published on: 04-04-2018 at 03:05 IST