भापकर कुटुंबीयांवर ४ वर्षांसाठी बंदी
बेकायदेशीर गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये गोळा करणाऱ्या साईप्रसाद कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला ‘सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) गुंतवणूकदारांचे सुमारे ६१५ कोटी रुपये परत करण्याचा आदेश दिला आहे. तसेच कंपनी आणि तिचे संचालक बाळासाहेब भापकर, शशांक भापकर आणि वंदना भापकर यांना चार वर्षांसाठी भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे.
सेबीच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी जमीन विकसनासाठी संयुक्त भागीदारी प्रकल्प राबविण्याच्या नावाखाली बेकायदेशीर गुंतवणूक योजना चालवत होती. त्यासाठी ‘सेबी’कडून कुठल्याही परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. या योजनांच्या माध्यमातून कंपनीने २०१२-१३ या वर्षांत १३७ कोटी १२ लाख रुपये, तर २०१३-१४ या वर्षांत ४७८ कोटी ३५ लाख रुपये गोळा केले. असे करताना कंपनीने नियमांचा भंग केल्यामुळे या योजना गुंडाळण्याचे व गुंतवणूकदारांचे पैसे हमी परताव्यासह तीन महिन्यांत परत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ‘सेबी’चे पूर्णवेळ सदस्य प्रशांत शरण यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भातील अहवाल त्यापुढील पंधरा दिवसांत सादर करण्याबाबतही कंपनीला बजावण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त कंपनीला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठीच्या कारणाव्यतिरिक्त मालमत्ता विक्रीस मनाई करण्यात आली आहे. आदेश न पाळल्यास कंपनी आणि तिच्या संचालकांना चार वर्षांच्या कालावधीनंतरही बाजारात व्यवहार करण्यास बंदी असेल. तसेच ही कंपनी बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही ‘सेबी’ संबंधित यंत्रणांना देणार आहे. ‘सेबी’ने २०१४मध्येच या कंपनीवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी याच समूहाच्या साईप्रसाद प्रॉपर्टीज व साईप्रसाद फूड या कंपन्यांवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai prasad corporation get orders to return 615 million to investors
First published on: 04-02-2016 at 05:49 IST