मोबाइल, स्मार्टफोन, टॅब आणि एलसीडीमध्ये आधीच इतर ‘ग्लोबल ब्रॅण्ड्स’वर गुणवत्तेने मात करण्यात अग्रेसर बनत असलेली कोरियाई कंपनी ‘सॅमसंग’ आता ‘स्मार्ट रेफ्रिजरेटर्स’ आणि ‘स्प्लीट एअर कंडिशन’द्वारे महत्त्वाच्या ‘होम अप्लायन्स’ची बाजारपेठ काबीज करण्यास सज्ज झाली आहे. भारतातील ग्राहकांच्या अपेक्षांचा आणि लहान शहरांतील भारनियमन समस्यांचा विचार करून अधिक ‘एनर्जी सेव्हर्स’ आणि तुलनेत नव्या सुविधांचा दावा करीत सॅमसंग वसाहतीकरणाची वाट धुंडाळत आहे.
चेन्नईजवळ असलेल्या श्रीपेरुम्बुदूर येथील सॅमसंग फॅक्टरीमध्ये स्प्लीट एअर कंडिशनच्या २९ मॉडेल्सचे आणि डिजिटल इन्व्हर्टर, फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्सच्या २६ मॉडेल्सचे मंगळवारी व्यावसायिक उद्घाटन करण्यात आले. या वेळी सॅमसंग इंडिया, ‘होम अप्लायन्स’चे प्रमुख राजीव भुतानी यांनी, भारतीय ग्राहकांच्या फ्रीजबाबतच्या अपेक्षा, खाद्यपदार्थ, भाज्या साठवणूक करण्याच्या त्यांच्या गरजांचा अभ्यास करून रेफ्रिजरेटर्सची रचना करण्यात आली असल्याचे सांगितले. वीजपुरवठा तुटल्यानंतरही आठ तास आतील तापमान कायम ठेवणारे, स्टॅबिलायझर वा इतर इन्व्हर्टरची गरज नसणारे, एनर्जी सेव्हर्स स्मार्ट फ्रीज आणि स्प्लीट एसी सॅमसंगने बाजारात आणले आहेत. ‘फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर’ डिजिटल इन्व्हर्टर कम्प्रेसरसह १० वर्षांच्या वॉरंटीसह देणारी व अधिक नव्या सुविधा पुरविणारी सॅमसंग ही या अप्लायन्सबाबत पहिलीच उत्पादनकर्ती कंपनी बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १२ लाख रेफ्रिजरेटर्स आणि साडेचार लाख स्प्लीट एसी बनविण्याची क्षमता असलेल्या चेन्नईच्या फॅक्टरीतील ही नवी उत्पादने सॅमसंगच्या जुन्या तसेच देशभराच्या कानाकोपऱ्यात नव्याने उघडल्या जाणाऱ्या ३८० शोरूम्समधून उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष काय?
२५३ ते ४१५ लिटर्स क्षमतेच्या रेफ्रिजरेटर्सचे डिजिटल इन्व्हर्टर फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स महिन्याभरात बाजारपेठेत दाखल होणार आहेत. त्यातील ‘कुलपॅक’ या सुविधेद्वारे वीज गेल्यानंतरही आठ तासांचा काळ फ्रिजमधील तापमान हे सुरक्षित राहणार आहे. फ्रिजमधील न वापरल्या जाणाऱ्या भागाचा विचार करून त्यातील रॅक्स आणि भाज्या साठवणुकीची क्षमता यांत अभिनव रचनेच्या कल्पना राबविल्या गेल्या आहेत. तापमान नियंत्रणाबाबतही स्मार्ट नियंत्रण रचना करण्यात आली आहे. स्प्लीट एसीही अधिकाधिक एनर्जी सेव्हर्स म्हणून अधिक कार्यक्षम ठरतील अशा आहेत. भारनियमनाचा सामना करावा लागणाऱ्या छोटय़ा शहरांमध्ये ही उत्पादने अत्यंत उपयोगी ठरू शकतील.

बाजारपेठ स्थिती काय?
बाजारपेठेमध्ये २०१३ साली रेफ्रिजरेटर्समध्ये ३५ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठणारी सॅमसंग २३,१०० ते ६०, ९९० या किंमत श्रेणीमध्ये स्प्लीट एअर कंडिशन्स आणि १७,१५० ते १ लाख ७९ हजार इतक्या किंमत श्रेणीमध्ये रेफ्रिजरेटर्स घेऊन येत आहे. सध्या बाजारपेठेमध्ये या दोन उत्पादनांबाबत तुलनेने खूप स्वस्त असलेल्या ब्रॅण्डसचे वर्चस्व आहे. मात्र यामधील सुविधांचे स्वरूप किंमत अधिक असूनही ग्राहकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरू शकतील असे आहे. त्यामुळे सॅमसंग या उत्पादनांद्वारे येत्या काही काळामध्ये ‘व्हिडीओकॉन’, ‘एलजी’ आणि ‘व्हर्लपूल’ंसोबत तीव्र ग्राहक स्पर्धा करणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung ready to capture home appliances market with smart refrigerator and split air condition
First published on: 01-02-2013 at 01:41 IST