स्टेट बँक, अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी, येस बँकेचे कार्डधारक बाधित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँक व्यवहारांची माहिती ‘हॅक’ झाल्याच्या प्रकाराचा फटका विविध बँकांच्या तब्बल ३२ लाख डेबिट कार्डधारकांना बसला आहे. स्टेट बँकेबाबत हा प्रकार मोठय़ा प्रमाणात आढळल्यानंतर आता काही बडय़ा  खासगी बँकांही जोखीम जाळ्यात अडकल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, बँकांकडूनच आतापर्यंत ३२ लाख डेबिट कार्ड माघारी घेण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, सरकारने बाधित कार्डांचे प्रमाण अवघे ०.५ टक्के असल्याचे स्पष्ट करत ग्राहकांना नवीन कार्डे विनाशुल्क बदलून देण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक कार्ड माघारी बोलाविण्यामध्ये स्टेट बँक आघाडीवर असून तिने सहा लाखांहून अधिक कार्ड बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेचा उपाय म्हणून बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, सेट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक आदींनीही त्यांच्या ग्राहकांची कार्डे ‘ब्लॉक’ करण्याची तसेच ही कार्डे बदलून देण्याची पावले उचलली आहेत.

खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवहारांची माहिती विदेशातून ‘हॅक’ झाल्यानंतर बँकेने चौकशीचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. यानंतर याच क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक यांनीही तिच्या खातेदारांना सावधतेचा इशारा देत पिन क्रमांक बदलण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक बँक १ ते ३ लाख डेबिट कार्ड बदलून देण्याच्या तयारीत आहे.

कार्ड पुरवठादार, देयक तंत्रज्ञान सेवा पुरवठादार कंपन्यांनाही विविध बँकांनी सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. डेबिट कार्ड विनाशुल्क नव्याने देण्याबरोबरच याबाबत सावधगिरीच्या उपाययोजना बँकांच्या शाखांमधून सांगितल्या जात आहेत.

गेल्या दोन दिवसांत पिन बदलणाऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षाही कमी राहिले आहे. १९ हून अधिक बँकांनी आपण सावधगिरीच्या उपाययोजना करत असून मोठय़ा प्रमाणात खातेदारांचे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मे, जूनमध्ये अमेरिका, ब्रिटन तसेच चीनमधून येथील बँकांची माहिती ‘हॅक’ झाल्याचा संशय असून अनेकांच्या खात्यातून रक्कम वजा होण्याच्या वाढत्या घटना सप्टेंबरमध्ये घडल्याचे आता समोर येत आहे.

अगदी पारपत्र नसलेल्या बँक ग्राहकांच्याही खात्यातून रक्कम वजा झाल्याचे समोर आले आहे. कार्ड पुरवठादार कंपन्यांनीही या घटनेवर आपली नजर असून सुरक्षिततेच्या उपाययोजनेला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

खातेदारांनी घ्यावयाची काळजी

  • बँकेच्या कार्डधारकांनी शक्यतो संबंधित बँकेच्या एटीएमद्वारेच व्यवहार करावे.
  • एटीएम कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगचा पिन सातत्याने बदलता ठेवावा.
  • आंतरराष्ट्रीय देयक व्यवहार तूर्त टाळले जावेत.
  • एटीएममधून कमीत कमी रक्कमच काढली जावी.
  • मोबाईल अथवा इंटरनेटद्वारे होणाऱ्या देयक व्यवहाराकरिता डेबिट कार्डाची माहिती ‘सेव्ह’ करणे टाळा.

 

सरकारने माहिती मागविली!

घटनेची दखल केंद्रीय वित्तीय सेवा विभागाने घेतली असून बँकांचे नेतृत्व करणाऱ्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए)’कडून विस्तृत माहिती मागविली आहे.

या नावांभोवती तपास :

  • हिताची पेमेंट सव्‍‌र्हिसेस (देयक तांत्रिक सेवा पुरवठादार)
  • मास्टरकार्ड, व्हिसा व रूपे (कार्ड पुरवठादार)
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi says over 6 lakh debit cards being replaced on security breach fears
First published on: 21-10-2016 at 02:39 IST