जेट एअरवेजकरिता नव्या भागीदाराची प्रक्रिया मेपर्यंत पूर्ण होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समभाग खरेदीच्या रूपातील जेट एअरवेजवरील स्टेट बँकेचे वर्चस्व तात्पुरते राहणार आहे. १,५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह सर्वात मोठय़ा सरकारी बँकेने कंपनीवर ५१ टक्के मालकी मिळविली असली तरी नव्या भागीदाराकरिता प्रक्रिया करावी लागणार आहे. तोपर्यंत स्टेट बँक आपले प्रतिनिधी विमान कंपनीवर नेमू शकण्याचा मार्गही मोकळा असेल.

यापूर्वी सादर केलेल्या आराखडय़ानुसार, स्टेट बँकेने जेट एअरवेजचा ५१ टक्के हिस्सा मिळविला. यानंतर जेटचे प्रवर्तक नरेश गोयल व अन्य एक भागीदार एतिहादचाही हिस्सा जवळपास निम्म्यावर आला. केंद्र सरकारने केलेल्या निर्देशानुसार स्टेट बँकेने जेटला आर्थिक बळ देऊ केले असले तरी तात्पुरते संचालक मंडळ नेमून तूर्त कारभार करावा लागणार आहे.

जेटकरिता नवा भागीदार मिळविण्याची प्रक्रिया मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांकडून स्वागत!

अर्थविवंचनेतील जेट एअरवेजवरून गोयल दाम्पत्याचे दूर होण्याच्या कृतीचे भांडवली बाजारातील सूचिबद्ध नागरी हवाई वाहतूक कंपनीच्या गुंतवणूकदारांनी सोमवारी जोरदार स्वागत केले. समभागाने सप्ताहारंभीच्या सत्रात १८ टक्के मूल्यउसळी नोंदविली.

नो टेक ऑफ, ओन्ली लँडिंग..

नरेश गोयल हे जेट एअरवेजच्या स्थापनेपासून संस्थापक होते. ७० वर्षीय गोयल यांचा नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील ४० वर्षांचा अनुभव आहे. तर त्यांच्या पत्नी अनिता या कंपनीच्या संचालक सदस्या, उपाध्यक्षपदीही राहताना विपणन, विक्री आदी जबाबदारी हाताळत. एतिहादने २०१३ मध्ये ६० कोटी डॉलरच्या सहाय्यासह कंपनीत २४ टक्के भागीदारी मिळविली होती. याद्वारे कंपनीच्या संचालक मंडळावर एतिहादला आपला एक प्रतिनिधीही नेमता आला; त्यानेही सोमवारी राजीनामा दिला. अर्थचिंता वाढल्यानंतर संयुक्त अरब अमिरात कंपनीने जेटमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सहारा समूहातील विमान सेवा ताब्यात घेतल्यानंतर जेट एअरवेजच्या अडचणीत अधिक वाढ होत गेली. एकीकडे एकमेव सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाभोवती आर्थिक चणचणीचा फास आवळत असताना इंडिगो, एअर इंडिया, स्पाईसजेट, विस्तारासारख्या नवागत खासगी विमानसेवा कंपन्यांचाही जेटला स्पर्धात्मक सामना करावा लागत होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbis dominance over temporarily
First published on: 26-03-2019 at 01:25 IST