शुक्रवारच्या साडेचारशे अंशांच्या घसरणीत सप्ताहारंभी सोमवारी आणखी १५० अंशांची सलग भर पडून मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्स १९,६१० या महिन्याभरापूर्वीच्या नीचांकाला जाऊन पोहचला. मात्र पडत्या बाजारातही इन्फोसिसचा भाव मात्र तब्बल साडेचार टक्क्यांनी वधारला. कंपनीची धुरा संस्थापक एन. आर. नारायणमूर्तीच्या हाती सोपविण्यात आल्याच्या निर्णयाने बाजारात गुंतवणूकदारांमध्ये हर्ष निर्माण केला.  
एचएसबीसीच्या सर्वेक्षणात कारखान्यातील उत्पादनदराला सलग चौथ्या महिन्यात ओहोटी लागल्याचे पुढे आलेले चित्र आणि डॉलरच्या तुलनेत कमजोर होत असलेल्या रुपया या घटकांनी बाजारभावनांना कमालीचा धक्का लावला असल्याचे आढळून येत आहे. कालच मे महिन्यातील खराब विक्रीचे आकडे जाहीर करणाऱ्या वाहन उद्योगातील कंपन्यांना बाजारात आज विक्रीचा दणका बसला. विशेषत: दुचाकी कंपन्यांच्या समभागांचे भाव कमालीचे घसरले. उद्योगक्षेत्रवार तेल व वायू क्षेत्र निर्देशांकाची सर्वाधिक घसरण झाली.
गेल्या सलग तिमाहीत खराब कामगिरी नोंदविणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान अग्रणी इन्फोसिसला तिचे पूर्ववैभव नारायणमूर्ती यांच्या नेतृत्व पुन्हा मिळवून देईल, असा आशावाद आज बाजारात दिसून आला. इन्फोसिस हा ‘अ’ वायदा गटातील सर्वाधिक उलाढाल नोंदविणारा समभाग ठरला. इन्फोसिसने आज शुक्रवारच्या तुलनेत १०६ रुपयांची (४.४ टक्के) कमाई करीत दिवसअखेर रु. २५१४ अशी भाव पातळी गाठली.
आशियाई बाजारातील नरमाई तसेच घसरणीसह खुले झालेल्या युरोपीय बाजारांमुळे आपल्या शेअर बाजारावर निराशेचे सावट दिसून आले. सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभाग घसरणीसह बंद झाले, त्यात आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी तसेच वाहन उद्योगातील मारुती सुझूकी, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो तसेच सन फार्मा यांचा मोठा वाटा राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Sensex down 150 pts at one month low
First published on: 04-06-2013 at 12:11 IST