मुंबई : जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरण आणि देशांतर्गत पातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तिमाहीतील निराशाजनक कामगिरीने गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध पवित्रा घेण्यास भाग पाडले आहे. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाल्याने सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये सोमवारी दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया आणि मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्क्यांवर पोहचल्याने गुंतवणूकदारांनी नफावसुलीला अधिक प्राधान्य दिले. गेल्या आठवडय़ात दोन दिवसांच्या अवकाशानंतर सलग चौथ्या सत्रात घसरणीचा कल कायम असून सेन्सेक्सची सकाळच्या सत्रात कमकुवत सुरुवात झाली. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स ५६,८४२.३९ अंशांचा तळ गाठला. दिवसअखेर तो १,१७२.१९ अंशांच्या घसरणीसह ५७,१६६.७४ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये ३०२ अंशांची घसरण होत तो  १७,१७३.६५ पातळीवर बंद झाला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि विप्रोच्या समभागांचे घसरणीत मोठा वाटा राहिला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रातील निर्देशांक सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही हंगामाची प्रतिकूल सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांनी समभागात मोठय़ा प्रमाणात विक्रीचा मारा केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचारी गळतीचे वाढते प्रमाण (अ‍ॅट्रिशन), नफ्यात घसरण, वेतनवाढ आणि उद्योगांकडून माहिती तंत्रज्ञानावर खर्च घटवल्याने सोमवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने खनिज तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे भारताची घाऊक किंमत-आधारित महागाई मार्चमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. परिणामी, रिझव्‍‌र्ह बँकेकडून महागाईला वेसण घालण्यासाठी येत्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदले. सेन्सेक्समध्ये इन्फोसिसच्या समभागात सर्वाधिक ७.२७ टक्क्यांची, तर एचडीएफसी बँकेच्या समभागात ४.७४ टक्क्यांची घसरण झाली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls adverse global climate infosys hdfc bank biggest drop shares ysh
First published on: 19-04-2022 at 00:02 IST