मुंबई : रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा खनिज तेलाच्या दरात वाढ होण्यास कारणीभूत ठरली आहे.  परिणामी त्याचे पडसाद सोमवारी देशांतर्गत भांडवली बाजारात उमटले. बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि तेल कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच, २६० अंशांची उसळी घेत ५८,१२७.९५ अंशांच्या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र दुपारच्या सत्रात नफावसुलीला सुरुवात झाल्याने दिवसअखेर ५७१.४४ अंशांच्या घसरणीसह ५७,२९२.४९ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६९.४५ अंशांची घसरण घसरण झाली आणि तो दिवसअखेर १७,११७.६० वर बंद झाला. आधीच्या दोन सत्रांत ‘सेन्सेक्स’ने २,००० तर निफ्टीने ६२० अंशांची कमाई केली होती.

रशिया आणि युक्रेन युद्धावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने आणि आखातातील तेल उत्पादक देशांमधील वाढत्या अस्थिरतेमुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम आहे. परदेशी संस्थामक गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी भारतीय बाजाराकडे मोर्चा वळविला आहे. मात्र देशांतर्गत पातळीवर घाऊक डिझेलच्या किमतीत प्रति लिटर २५ रुपयांची मोठी वाढ केली गेल्याने महागाई पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

‘सेन्सेक्स’मध्ये पॉवर ग्रीड (२.९३ टक्के), एशियन पेंट्स (२.८५ टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (२.८१ टक्के), कोटक बँक (२.४२ टक्के), हिंदूस्तान युनिलीव्हर (२.४१ टक्के) आणि एचसीएल टेक्नोलॉजीजच्या (२.३२ टक्के) समभागात घसरण झाली.