सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजारानेही मंगळवारच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर पतधोरणावर नाराजी व्यक्त केली. शतकी नुकसानाने सेन्सेक्स २९ हजारांवर येऊन ठेपला, तर जवळपास अर्धशतकी घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी त्याच्या ८,८०० पासून आणखी लांब गेला.

१२२.१३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २९,०००.१४ वर तर ४०.८५ अंश घसरणीने निफ्टी ८,७५६.५५ पर्यंत खाली आला. सलग तीन व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ६८१.६३ अंशाने कोसळला आहे.
व्याजदर कपातीच्या आशेवर सुरू झालेल्या भांडवली बाजाराचे व्यवहार सुरुवातीला तेजीत होते. असे करताना मुंबई निर्देशांक सोमवारच्या तुलनेत १३० अंशांची वाढ नोंदवित होता. सेन्सेक्स यावेळी २९,२५३ पर्यंतची मजल मारत होता.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदरामुळे गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त करत निर्देशांकाला खाली खेचले. बाजारातील अर्थातच व्याजदराशी संबंधित समभागांचे मूल्य यावेळी कमालीचे घसरले. एकूण बँक निर्देशांकही २.६१ टक्क्य़ांनी रोडावला, तर स्थावर मालमत्ता निर्देशांक १.४३ टक्क्य़ांनी घसरला.
सेन्सेक्समधील निम्म्याहून अधिक समभाग घसरले. त्यातही खासगी अ‍ॅक्सिस बँक समभाग सर्वाधिक ४.९५ टक्क्य़ांनी आपटला. अन्य बँकांसह वाहन क्षेत्रातील समभागांनीही घसरणीला साथ दिली.
२९ हजारावर आलेला सेन्सेक्स आता गेल्या पंधरवडय़ाच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. २१ जानेवारी रोजी मुंबई निर्देशांक २८,८८८.८६ वर होता, तर निफ्टीचा मंगळवारचा प्रवास ८,७२६ ते ८,८२७ असा राहिला.