मुंबई : जागतिक पातळीवर दिसलेल्या खरेदीतील उत्साहाकडून प्रेरणा घेऊन देशांतर्गत भांडवली बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांनी धातू, ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील समभाग खरेदीचा सपाटा लावला. परिणामी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने २.५ टक्क्यांनी वधारत तीन महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,३४४.६३ अंशांनी म्हणजेच २.५४ टक्क्यांनी वधारून ५४,३१८.४७ या आठवडय़ातील उच्चांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरातील कामकाजात १,४२५.५८ अंशांची कमाई करत ५४,३९९.४२ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४१७ अंशांची म्हणजेच २.६३ टक्क्यांची वाढ झाली आणि तो १६,२५९.३० पातळीवर स्थिरावला. निफ्टीमधील आघाडीच्या सर्व ५० कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टीने १५ फेब्रुवारीनंतर एका दिवसात १,३४५ अंशांची झेप घेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

धातू निर्देशांक आणि प्रमुख निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्सच्या समभागाने चमकदार कामगिरी केल्याने मंदीवाल्यांचा बाजारावरील जोर कमी झाला. शिवाय एप्रिल महिन्यातील घाऊक महागाई दर १५ टक्क्यांच्या पुढे सरकला असतानाही भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक अडीच टक्क्यांहून अधिक वधारल्याने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले. मात्र गेल्या काही सत्रांतील मोठय़ा घसरणीनंतर तेजीची ही केवळ क्षणिक झुळूक आहे, असे निरीक्षण एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग ७.६२ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ रिलायन्सचा समभाग ४.२६ टक्के वधारल्याने सेन्सेक्स एका आठवडय़ाच्या उच्चांकी पातळीवर बंद होण्यास यशस्वी ठरला. त्यापाठोपाठ इन्फोसिस, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स आणि मारुतीच्या समाभागाने निर्देशांक वाढीस हातभार लावला.