मंगळवारी भांडवली बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले, पण गेले सलग सहा दिवस सुरू असलेली मरगळ बाजारावर कायम दिसली. सेन्सेक्स ३१.४४ अंशांनी वाढून २६,५९०.५९ अंशांवर तर निफ्टी अवघ्या ९.९० अंशांच्या कमाईसह ८,०६०.७० अंशांवर स्थिरावला.
सेन्सेक्सने चार आठवडय़ांपूर्वीच्या तळातून डोके वर काढले हेच मंगळवारच्या बाजारातील व्यवहाराचे वैशिष्टय़ ठरले. अत्यंत अस्थिर स्वरूपाचे व्यवहारांत बाजारात काही मौल्यवान समभागांची खालच्या भाव स्तरावर खरेदी सुरू असल्याचेही मंगळवारी आढळून आले.
सोमवारी बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर सप्टेंबरमधील प्रमुख उद्योगक्षेत्राच्या वाढीच्या दराने चार महिन्यांचा उच्चांक गाठल्याचा, बाजारातील सकाळच्या प्रारंभिक व्यवहारांवर सकारात्मक परिणाम दिसला. आशियाई बाजारातील तेजीच्या वातावरणानेही उत्साह भरला होता. तथापि, इंडियन ऑइलसह प्रमुख कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही कामगिरीने बाजाराचा मूड पालटल्याचेही दिसून आले.
मंगळवारच्या अत्यंत निरुत्साही व अस्थिर व्यवहारांमध्ये एनटीपीसी, महिंद्र, ओएनजीसी, हिंडाल्को हे आघाडीचे समभाग वधारले. क्षेत्रनिहाय आयटी उद्योगक्षेत्राच्या निर्देशांकाने सर्वाधिक ०.९१ टक्क्यांची कमाई केली.

निवडणूक निकालांवर नजर!
जागतिक महत्त्वाच्या घटनांच्या परिणामी बाजारात गेले काही दिवस वातावरण नरम राहिले आहे. आता बाजाराची नजर देशांतर्गत राजकीय घडामोडींकडे वळली आहे. बिहार निवडणूक निकाल काय येतो, यावरून बाजाराची दिशा ही ठरेल असा विश्लेषकांचा होरा आहे. राज्यापुरते हे निवडणूक निकाल असले तरी त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणात उमटतील. डिसेंबरमध्ये पुन्हा अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीची शक्यता आणि हिवाळी अधिवेशनात कळीच्या आर्थिक सुधारणांच्या मुद्दय़ावर सामोपचाराच्या दिशेने मोदी सरकारच्या सुयशाची बाब बाजाराच्या गतीवर परिणाम करणारी ठरेल, असेही विश्लेषक सांगत आहेत. प्रत्येक घसरणीच्या प्रसंगी मजबूत आर्थिक पाया असलेल्या समभागांच्या खरेदीची शिफारसही विश्लेषकांनी केली आहे.