मुंबई : रिझव्‍‌र्ह बॅंकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर आयात-निर्यात व्यवहार भारतीय रुपयात करण्यासाठी बँकांना स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची सोमवारी परवानगी दिली आहे. निर्यातीवर लक्ष केंद्रित करून जागतिक व्यापार वाढीला चालना देण्यासाठी आणि भारतीय रुपयामध्ये जागतिक व्यापारी समुदायाच्या वाढत्या स्वारस्यास समर्थन देण्यासाठी निर्यात/आयातीची देयकांसाठी बँकांना अतिरिक्त व्यवस्था करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. बँकांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या परकीय चलन विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तू आणि सेवांची आयात -निर्यात करताना आता रुपयामध्ये व्यवहार पूर्ण करता येणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, या व्यवस्थेअंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांचा निपटारा भारतीय रुपयामध्ये पूर्ण करता येणार आहे. बँकांना रुपी व्होस्ट्रो खाती उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, कोणत्याही देशासोबत व्यापार व्यवहारांच्या पूर्ततेसाठी, भारतातील बँक भागीदार व्यापारी देशाच्या बँकेत विशेष रुपी व्होस्ट्रो खाती उघडू शकते. या यंत्रणेद्वारे आयात- निर्यात व्यवहार भारतीय रुपयामध्ये पूर्ण  केले जातील.